नदीत माती व दगड परीक्षणाचे काम सुरू, आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणांतर्गत कामांना वेग
सतीश चव्हण/ कराड
पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणांतर्गत कराड शहरानजीक कोयना नदीवर असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला आणखी दोन नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी नदीपात्र व पात्राच्या दोन्ही बाजूला जवळपास 40 फुट खोल ड्रील मारून माती व दगड परीक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. तर महामार्गालगत असेली अतिक्रमणे काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. आवश्यक असणाऱया जागेची नव्याने भूसंपादन प्रकिया राबवण्यात येत आहे. तर सहा पदरीकरणांततर्गत येणाऱया झाडांचा सर्व्हे करण्याचे कामही दोन दिवसांत सुरू होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.
पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रजनजीक इंदोली फाटा व मसूर फाटा येथे नव्याने बांधण्यात येणारे उड्डाणपूल हे सहा पदरीच्या नियोजनानुसार बांधण्यात येत आहेत. तर कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपुलासाठी सुमारे चारशे कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. हा पुलही सहा पदरीकरणाच्या नियोजनानुसारच होणार आहे. महामार्गावरी उंचवटे व खोलगट भाग काढण्याच्या दृष्टीने सध्या पूर्ण महामार्गाच्या सर्व्हेचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
कराड शहरानजीक कोयना नदीवर सध्या दोन पदरीचे दोन पूल आहेत. सहा पदरीकरणांतर्गत याठिकाणी आणखी दोन लेन वाढणार आहेत. तर सेवारस्ताही करावा लागणार असल्याने या ठिकाणी आणखी पुलाची आवश्यकता आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून या ठिकाणी दोन पूल प्रस्तावित आहेत. सध्या असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला दोन पूल होतील, अशी प्राथमिक माहिती राष्ट्रीय महामार्गाकडून मिळत आहे. नवीन पूल बांधण्याच्या दृष्टीने सध्या या ठिकाणी माती व दगड परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी नदीपात्रात व पात्राच्या दोन्ही बाजूला 40 फुट खोल ड्रील मारून माती व दगडाचे परीक्षण करण्यात येणार आहे.
महामार्गालगतची अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू
आशियाई महामार्गालगत पूर्वी संपादित केल्या जागेत अनेक ठिकाणी अतिक्रमणे करण्यात आली आहेत. सहा पदरीकरणाचे काम करण्याच्या दृष्टीने महामार्गालगतची जागा मोकळी असणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सध्या अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. महामार्गासाठी पूर्वी संपादित केलेल्या जागेतील अतिक्रमणे काढून जागा मोकळी करण्यात येत आहे.
नवीन भू संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
महामार्गाच्या सहा पदरीकरणांतर्गत ज्या ठिकाणी जादा जागेची आवश्यकता आहे, त्याठिकाणी भू संपादन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तर खासगी क्षेत्रातील बाधित झाडांचा सर्व्हे झाला असून त्याचीही भरपाई देण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पेठ नाका ते वळसे फाटा झाडांचा सर्व्हे
महामार्गाच्या सहा पदरीकरणांतर्गत येणाऱया झाडांचा सर्व्हे करण्याचे काम दोन दिवसांत सुरू होणार आहे. पेठ नाका ते वळसे फाटा या दरम्यान महामार्गालगत असणाऱया व बाधित होणाऱया झाडांचा सर्व्हे या अंतर्गत करण्यात येणार आहे.
महामार्गाच्या सर्व्हेचे काम सुरू
अतिवृष्टी व महापुराच्या काळात महामार्गावर पाणी भरल्याने महार्गावरील वाहतूक बंद झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे सहा पदरीकरणाचे काम करताना महामार्गावर पाणी भरणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सध्या संपूर्ण महामार्गाचा सर्व्हे करण्यात येत आहे. महामार्गावरील उंच भाग व खोलगट भागाचा सर्व्हे या अंतर्गत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.