प्रसार रोखण्यासाठी पालिका व नागरी आरोग्य विभागाचा उपक्रम
कराड / वार्ताहर
बाधितांच्या जास्तीत जास्त निकट सहवासितांची तपासणी करता यावी तसेच वयोवृद्ध व्याधिग्रस्तांचे मृत्यूचे प्रमाण रोखता यावे, यासाठी आता घरोघरी जाऊन कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या संकल्पनेतून कराड नगरपालिका व नागरी आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी दोन रुग्णवाहिकांसह 25 जणांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. शनिवारी पहिल्याच दिवशी या पथकाने 56 लोकांची तपासणी केली.
कराड शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका व नागरी आरोग्य केंद्र जिवाचे रान करीत आहे. मात्र अनेकवेळा बाधितांकडून संपर्क लपवले जात आहेत. तर अनेक निकट सहवासित तपासणी करण्यासाठी पुढे येत नाहीत. आरोग्य विभागाला सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. तसेच घरी असलेल्या वयोवृद्ध व्याधिग्रस्त नागरिकांची वेळेत तपासणी झाली तर त्यांना वेळेत उपचार मिळतील व वयोवृद्ध नागरिकांचे मृत्यू रोखता येतील. यासाठी पालिका व नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शनिवारपासून घरोघरी जाऊन कोरोनाची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी दोन रुग्णवाहिका व 25 जणांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. यात पोलीस, आरोग्य कर्मचारी, पालिका कर्मचारी व आशा स्वयंसेविकांचा समावेश आहे. शनिवारी पहिल्याच दिवशी 56 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात 21 वयोवृद्ध व 35 निकट सहवासितांचा समावेश आहे. तपासणीसाठी घरी आलेल्या पथकाला जे लोक सहकार्य करणार नाहीत, त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पूर्ण पत्ते घेण्याच्या सर्व लॅबना सूचना
तपासणीसाठी आलेल्या नागरिकांचे पूर्ण पत्ते घेतले जात नसल्याने बाधित अहवाल आल्यानंतर अशा लोकांना शोधणे कठीण होत आहे. चुकीचे पत्ते असल्याने रूग्ण शोधण्यात आरोग्य विभागाचा वेळ व ताकद वाया जात आहे. यासाठी तपासणीसाठी येणाऱया नागरिकांचे पूर्ण पत्ते व मोबाईल नंबर घेण्याच्या सूचना पालिकेच्या वतीने सर्व लॅबना देण्यात आल्या आहेत.