ओळखपत्र नसणाऱया 3600 लोकांना होणार लसीकरण
वार्ताहर/ कराड
ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही अशा स्थलांतरित, भटके, वीट कर्मचारी आदी लोकांनाही लसीकरणाचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या व्हॅक्सीन ऑन व्हील सेवेचा शुभारंभ कराडला करण्यात आला. शहरासह तालुक्यातील 3600 लोकांना या सेवेच्या माध्यमातून लसीकरण होणार आहे. बुधवारी शहरातील बुधावर पेठेसह तालुक्यातील कोळे येथे या ठिकाणी लसीकरण करण्यात आले.
व्हॅक्सीन ऑन व्हील या सेवेचा शुभारंभ पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोरबू आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना विरूद्धच्या लढाईत लसीकरण हे प्रमुख अस्त्र असल्याने प्रशासनाने युद्धपातळीवर लसीकरण सुरू केले आहे. तालुक्यासह जिल्हाभरात सर्व शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे. तर खासगी रूग्णालयांच्या माध्यमातूनही लसीकरण करण्यात येत आहे.
लसीकरण करताना आधार कार्ड व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. मात्र शहरासह ग्रामीण भागात राहणाऱया ज्या लोकांकडे ओळखीचा पुरावा नाही, अशा दुर्गम, वाडय़ा-वस्तीसह वंचित, स्थलांतरित, वीटभट्टी कामगार, भंगार गोळा करणारे, झोपडपट्टीत राहणाऱया लोकांनाही लसीकरण करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाने व्हॅक्सिन ऑन व्हील ही सेवा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कराड शहर व तालुक्यासाठी दोन स्वतंत्र रूग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. याबरोबरच दोन स्वतंत्र डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱयांच्या टिमची नेमणूक करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यात एकूण 3600 अशा लोकांची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या सर्व लोकांना या योजनेद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ सबंधित घटकांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे. या ऊपक्रमात जिल्हा समन्वयक इरशाद तांबोळी यांच्यासह डॉ. वीणा काकडे, डॉ. मेघा अनुगडे, डॉ खबाले यांच्या समवेत परिचारिका, आरोग्य सेविका व मदतनीस या दोन टिममध्ये सहभागी झाले आहेत.