वार्ताहर/ कराड
महाराष्ट्र दिनापासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या 18 वर्षांवरील लाभार्थी लसीकरण मोहिमेअंतर्गत उपजिल्हा रूग्णालयात दोन दिवसांत 256 युवकांना लसीकरण करण्यात आले. लसीअभावी तालुक्यातील सर्व केंद्रावरील 45 वर्षावरील लाभार्थांचे लसीकरण मात्र तीन दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून कराड तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्र 64 उपकेंद्र, नागरी आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालय, उंडाळे ग्रामीण रूग्णालय व 12 खासगी केंद्र अशा एकुण 90 केंद्रांच्या माध्यमातून 45 वर्षावरील लाभार्थांना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. 45 वर्षावरील 50 टक्केहून अधिक लसीकरण झाले आहे. लशीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहीम वारंवार थांबवावी लागत आहे. लस उपलब्ध न झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कराड तालुक्यातील लसीकरणाची मोहीम थांबलेली आहे.
दरम्यान 1 मे पासून शासनाच्या माध्यमातून 18 ते 45 वयोगटातील लाभार्थांसाठी प्रायोगिक तत्वावर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत दररोज 200 लाभार्थांना ऑनलाईन नोंदणी करता येते. त्याच 200 लाभार्थांना लसीकरणासाठी बोलवण्यात येते. शनिवारी पहिल्या दिवशी लसीकरणासाठी 200 पैकी केवळ 76 लाभार्थांनी प्रत्यक्षात लस घेतली. रविवारी 178 लाभार्थांनी लस घेतली. उपजिल्हा रूग्णालयात 18 ते 45 वयोगटातील प्रयोगीत तत्वावरील लसीकरण मोहिमेसाठी उपजिल्हा रूग्णालयात सात दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध झाला आहे. याबरोबरच लस उपलब्ध झाल्यानंतर 45 वर्षावरील लाभार्थांना लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे.