प्रतिनिधी /कराड
कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत गुरूवारी भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटून कार महामार्गावर उलटली. या अपघातात कारमधील प्रवासी जखमी झाले. दरम्यान काही वेळातच पाचवड फाटा परिसरात मिनीबस दुभाजकावर आदळून दुसरा अपघात झाला. या अपघातात मिनीबसचे नुकसान झाले. सुदैवाने दोन्ही वेगवेगळ्या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी सांगली जिह्यातील कार भरधाव वेगाने कोल्हापूरकडे निघाली होती. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर वाठार येथे आल्यावर चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार महामार्गावर उलटली. या अपघातात कारमधील प्रवासी जखमी झाले.
मिनिबस दुभाजकाला धडकली वाठार ता. कराड हद्दीत कारचा अपघात झाल्यानंतर काही वेळातच कोल्हापुरकडे निघालेल्या मिनीबसला अपघात झाला. मिनिबस पाचवड फाटा ता. कराड येथे आल्यावर चालकाचा ताबा सुटून दुभाजकावर धडकली. मिनीबस अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे. काही अंतरावरच दोन वेगवेगळे अपघात झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस विभागाचे पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, अशोक जाधव यांच्यासह पोलिस कर्मचारी व देखभाल विभागाचे कर्मचारी आणि कराड ग्रामिण पोलिस ठाण्याचे कर्मचारी त्वरित अपघातस्थळी दाखल झाले. क्रेनच्या साह्याने वाहने काडून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.