प्रतिनिधी/ सातारा
कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे चेन्नई विरुद्ध दिल्ली या आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱया चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून 1 एलसीडी व सेट टॉप बॉक्स, 1 लॅपटॉप, 9 मोबाईल फोन, टु व्हिलर गाडय़ा, रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकुण 4 लाख 2 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून वसीम इकबाल मोमीन (वय 33), समीर जावेद शेख (वय 30), मुनिर दस्तगिर चबनुर (वय 29), जैद जल्लालउद्दीन पालकर (वय 22 सर्व रा. कराड) यांना अटक केली.
अधिक माहिती अशी, दि. 17 रोजी पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखेला बातमी मिळाली होती की, गोळेश्वर (ता. कराड, जि. सातारा) या गावच्या हद्दीतील सज्जाद युनुस कच्छी यांच्या मालकीच्या माया एलाईटी काँटी रोहाऊस नं. 4 मध्ये काही इसम चेन्नई विरुध्द दिल्ली या 20-20 आयपीएल क्रिकेट सामन्यावर लोकांच्याकडुन फोनद्वारे संपर्क साधुन सट्टा नावाचा जुगार चालवित आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करुन छापा टाकण्याबाबत सूचना दिल्या.
सहा. पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी व त्यांच्या पथकाने गोळेश्वर कराड हद्दीतील मिळालेल्या बातमी ठिकाणी सापळा लावुन छापा टाकला असता तेथे चार इसम हायप्रोफाईल पध्दतीने चेन्नई विरुध्द दिल्ली या 20-20 क्रिकेट आयपीएल सामन्यावर लोकांच्याकडुन फोनवरुन सट्टा चालवित असताना मिळुन आले. त्यांच्याकडे 1 एलसीडी व सेट टॉप बॉक्स, 1 लॅपटॉप, 9 मोबाईल फोन, टु व्हिलर गाडय़ा, रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकुण 4 लाख 2 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याविरुध्द कराड शहर पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला आहे.