प्रतिनिधी/ कराड
कराड परिसरातील सहा वेगवेगळ्या पत्यांवर महागडे मोबाईल मागवत कुरिअर डिलीव्हरी बॉयला अर्धी रक्कम देत ती मोजण्यात व्यस्त ठेवून मोबाईलच्या बॉक्समधील मोबाईल काढून त्या जागी कपडे धुण्याचे साबण, बिस्कीटचे पुडे ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. याप्रकारे डिलीव्हरी बॉयची 1 लाख 69 हजार 937 रुपयांची फसवणूक झाली असून याप्रकरणी अभिजीत नितीन मोहिते (वय 25 रा. तळबीड ता. कराड) याने दिलेल्या फिर्यादीवरून सहाजणांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मलकापूर येथील आगाशिवनगर येथे नेटेक्स ट्रान्सपोर्टेशन कार्यालयात अभिजीत मोहिते व्यवस्थापक आहेत. सुपरव्हिजन करण्याचे काम ते करतात. त्यांच्याकडे 25 डिलीव्हरी बॉय आहेत. 4 सप्टेंबर रोजी मनिष, समाधान सिंग, स्वाती देशमुख, अनिकेत या नावांनी वेगवेगळ्या पत्त्यावर तब्बल सहा महागडे मोबाईल ऑनलाईन कंपनीकडून शहरातील सहाजणांनी मागवले होते. वेगवेगळ्या डिलिव्हरी बॉय यांनी त्यांची आगाशिवनगर, कार्वेनाका, विद्यानगर, सोमवार पेठ, तहसील कार्यालय परिसर या ठिकाणी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर व फोननंबरवर संपर्क साधून डिलीव्हरी केली. मात्र यावेळी संबंधितांनी निम्मे पैसे रोकड स्वरुपात देत ते मोजण्यास डिलीव्हरी बॉय यांना व्यस्त ठेवले. त्यावेळेत त्यांच्याकडील सहा मोबाईल बॉक्समधील मोबाईल काढून तेथे कपडे धुण्याचे साबण, बिस्कीट पुडे ठेवून बॉक्स पॅकबंद करुन ठेवले. त्यानंतर उर्वरित पैसे अगोदर ऑनलाईन पे करतो, असे सांगितले, काही वेळानंतर पैसे आता नाहीत आम्ही ऑफिसला येवून पैसे भरतो व त्यानंतर मोबाईल बॉक्स नेतो, असे सांगत ते बनावट मोबाईल बॉक्स डिलीव्हरी बॉयकडे परत दिले.
ऑफिसमध्ये परतल्यानंतर मोहिते यांनी सीसीटीव्ही यंत्रणेसमोर मोबाईल बॉक्स फोडून खात्री केली असता त्यामध्ये कपडे धुण्याचे साबण व बिस्कीट पुडे आढळले. त्यामुळे त्यांनी ज्या कंपनीकडून मोबाईल मागवले त्या हाऊसमध्ये संपर्क साधला. त्यानंतर त्यांना डिलीव्हरी बॉय यांच्यासोबत फसवणूक झाली असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी याबाबत शहर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.