चोरीच्या गुन्हय़ाचा दीड तासात छडा, ग्रामीण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / कराड
कराड ते करवडी असा रिक्षाने प्रवास करत असलेल्या महिलेच्या पर्समधील 1 लाख 11 हजारांचे दागिने चोरीस गेल्याची घटना गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अवघ्या दीड तासात छडा लावण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. दागिने चोर महिलांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुरूवारी 28 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सुप्रिया बापुसाहेब पिसाळ (रा. करवडी ता. कराड) या वडापच्या रिक्षातून प्रवास करत करवडीला आल्या. त्यांच्या पर्सच्या चोर कप्प्यातील एका डबीत दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, काळ्या मण्यातील सोन्याची वाटी व मणी तसेच पायातील जोडवी होती. हे 1 लाख 11 हजारांचे दागिने प्रवासात चोरीस गेल्याचे रिक्षातून उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या महेश लावंड, सज्जन जगताप, शशिकांत काळे, अमित पवार, पुनम चव्हाण, उत्तम कोळी यांना तपासाच्या सुचना दिल्या. त्यांनी फिर्यादी सुप्रिया पिसाळ यांच्याकडून माहिती घेत प्रवासात त्यांच्या शेजारी बसलेल्या महिलांचा शोध सुरू केला. करवडी परिसरातच या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी दागिने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत केले. चोरी केलेल्या महिला या औरंगाबादच्या असून त्यांच्यावर आणखी काही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.