शहरातील प्रत्येक रस्त्यावर कारवाईचा बडगा
प्रतिनिधी / कराड
कोरोनाचा वाढता आकडा रोखण्यासाठी कराड पोलिसांनी कडक कारवाईचे पाऊल उचलले आहे. शनिवारी कराड, मलकापूर, सैदापूर, वारूंजी भागातील मुख्य रस्त्यांवर पोलिसांनी विनामास्क नागरिक, युवक युवतींवर कारवाईचा बडगा उगारला. मास्क नसणारांना जागेवरच पाचशे रुपये दंड कारवाई केली. दिवसभरात पोलिसांनी सुमारे 147 जणांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल कडक समज दिली.
कराड तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून अनेक नागरिक बिनधास्तपणे विनामास्क फिरत आहेत. अशा बेजबाबदार लोकांवर शनिवारी सकाळपासून कडक कारवाईला सुरुवात झाली. कराड शहरात येणारया प्रत्येक रस्त्यावर एक अधिकारी व दहा ते बारा पोलीस कर्मचारी तैनात केले होते. ढेबेवाडी फाटा, वारूंजी फाटा, सैदापूर कॅनॉल या ठिकाणी पोलीस पथके विनामास्क वाहनधारकांसह पादचाऱयांना अडवत कारवाई करत होते. मास्क न वापरणारा कोणीही असो पोलीस त्याच्यावर कारवाई करतच होते. पोलिसांनी अडवल्यावर अनेक दुचाकीस्वार युवक, युवती ओळखीच्या नगरसेवक, पोलीस, प्रतिष्ठीतांना फोन करून पोलिसांवर दबाव आणायचा प्रयत्न करत होते. मात्र समोरचा कोणीही असो, मोबाईलवर बोलायचे नाही आणि दंड केल्याशिवाय सोडायचे नाही या पवित्र्यात पोलीस होते. पोलिसांच्या या पवित्र्याने मास्क न वापरणारया बेजबाबदार युवक युवती, नागरिकांचा चांगलाच पाणउतारा झाला.