प्रतिनिधी/ कराड
कराड आरटीओ कार्यालयातील खासगी एजंटगिरीचा सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी पर्दाफाश केला. नवीन दुचाकीची नोंदणी करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी कराडच्या आरटीओ कार्यालयातील एका खासगी एजंटावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. राजू जाधव असे संशयित खासगी एजंटाचे नाव आहे. सांगलीच्या लालुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एकाने नवीन दुचाकी घेतली होती. नव्या दुचाकीची नोंदणी आरटीओकडे करण्यासाठी कराड येथील खासगी एजंटाने संबंधित तक्रारदारास पाच हजारांची लाच मागितली. त्याची माहिती तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार सांगली पोलिसांचे पथकाने सापळा लावला. त्यामध्ये खासगी एजंट जाधव याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. संबंधिताने तक्रारदारांकडे साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांच्यासाठी पाच हजाराची लाच मागणी केली होती. संबंधित कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुरुदत्त मोरे, हवालदार संकपाळ, कलकुटगी, खाडे, माने, पवार यांनी केली, असे घाटगे यांनी सांगितले.