345 पतसंस्थांसह सहकारी संस्थांचे 65 कोटी रूपये अडकले, संस्था पाच जिह्यातील
प्रतिनिधी/ कराड
कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत निघाल्याने त्याचे अनेक क्षेत्रांवर परिणाम झाल्याचे समोर येत आहे. या बँकेत छोटय़ा पतसंस्था व इतर संस्थांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. एकूण 1727 पैकी 345 संस्थांच्या ठेवी 5 लाखांच्या वर असल्याने या संस्थांसमोर अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. उर्वरित 1382 संस्थांच्या ठेवी 5 लाखाच्या आतील असल्याने त्यांना पैसे मिळण्यात अडचणी येणार नाहीत, असे दिसत आहे.
29 शाखांसह पाच जिल्हय़ात कार्यक्षेत्र असणाऱया कराड जनता बँकेत 2005 नंतर ठेवींचा ओघ वाढला. सहकाराचे जाळे असणाऱया पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हय़ांमध्ये छोटय़ा पतसंस्था, गृहनिर्माण संस्था तसेच इतर सहकारी संस्थांनी आपल्या ठेवी या बँकेत ठेवल्या होत्या. छोटय़ा पतसंस्थांकडून मोठय़ा बँकेत पैसे ठेवले जातात. गरजेनुसार ते काढून ग्राहकांना दिले जातात. अशा अनेक पतसंस्थांनी कराड जनता बँकेत पैसे ठेवलेले होते. मात्र 7 नोव्हेंबर 2017 या दिवशी रिझर्व्ह बँकेच्या एका आदेशाने या बँकेवर निर्बंध आले. तेव्हापासून बँकेचे सर्व व्यवहार ठप्प आहेत. बँकेचा एनपीए प्रचंड वाढल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली.
सुमारे तीन वर्षांत संचालक मंडळ बरखास्ती, प्रशासकाची नियुक्ती करून बँकेच्या स्थितीत फरक न पडल्याने व बँकेचा तोटा प्रचंड वाढल्याने अखेर बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला. त्यानंतर सहकार आयुक्तांनी बँक दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय घेतला. तथापि ठेवींना 5 लाखांचे संरक्षण असल्याने बँकेच्या बहुतांश ग्राहकांना 5 लाखांपर्यंतचे पैसे परत मिळणार आहेत. या बँकेत सर्वसामान्य ठेवीदारांबरोबरच पतसंस्था व इतर सहकारी संस्थांच्याही ठेवी होत्या.