प्रतिनिधी/ कराड
कराड जनता सहकारी बँकेच्या ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदारांचे क्लेम फॉर्म आणि केवायसी फॉर्म भरून घेण्याची मुदत 31 डिसेंबरअखेर होती. मात्र फॉर्म जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती बँकेचे अवसायक तथा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली. त्यामुळे ठेवीदारांना फॉर्म भरण्यासाठी आणखी अवधी मिळाला आहे.
कराड जनता बँकेच्या सर्व ठेवींना 5 लाख रूपयांचे विमा संरक्षण आहे. बँकेचा परवाना रद्द करताना रिझर्व्ह बँकेने 99 टक्के ठेवीदारांचे 5 लाखाच्या आतील पैसे परत देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ठेव विमा व पतहमी कार्पोरेशनबरोबर झालेल्या चर्चेनंतर बँकेतर्फे ठेवीदारांची केवायसी घेण्यात येत आहे. 15 डिसेंबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली होती. 31 तारखेपर्यंत फॉर्म जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या 15 दिवसांत हजारो ठेवीदारांनी आपले फॉर्म बँकेच्या विविध शाखांमध्ये जमा केले आहेत. बँकेचे 1 लाख 99 हजारावर ठेवीदार असून यापैकी 40 हजार ग्राहकांनी आपले केवायसी व क्लेम फॉर्म जमा केले आहेत. अजूनही उर्वरित ग्राहकांनी आपले फॉर्म जमा केलेले नाहीत. त्यामुळे फॉर्म जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. बँकेच्या विविध शाखांमध्ये याबाबतचे पत्रक लावण्यात आले आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयाकडून पुढील सूचना येईपर्यंत फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे. अवसायक मनोहर माळी यांनी, ठेवीदारांनी फॉर्म तातडीने भरून देण्याचे आवाहन केले आहे.