प्रतिनिधी / कराड :
कराड तालुक्यातील गोवारे येथे डोक्यात दगड घालून युवकाचा खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री घडलेली ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
किरण लादे (वय 27) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. किरण लादे याचा शुक्रवारी पगार झाला होता. त्यानंतर सायंकाळी तो काही जणांबरोबर कराडलगत असलेल्या गोवारे गावच्या हद्दीतील चौंडेश्वरीनगरमध्ये गेला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. रात्री त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. ही बाब शनिवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. किरण लादे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉटेज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला.
दरम्यान खुनाची माहिती समजताच कराडमधील युवकांनी कॉटेज हॉस्पिटलच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पोलिसांनीही बंदोबस्त वाढविला होता. संशयित हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. काही संशयितांकडे पोलिसांची चौकशी सुरू असून, हल्लेखोर लवकरच सापडतील असा विश्वास बी. आर. पाटील यांनी व्यक्त केला आहे.