वनविभाग-पोलिसांचा संयुक्त तपास; खोडशीत कृष्णाकाठी बहेली फासकीत बछडा अडकला
प्रतिनिधी/ मसूर, कराड
कराड तालुक्यात बिबटय़ाचा वावर आता नेहमीचा झाला आहे. कराडजवळच्या खोडशी या गावात कृष्णा नदीकाठी फासकीत पाय अडकल्याने जखमी झालेला बिबटय़ाचा एक वर्षीय बछडा वनविभागाने ताब्यात घेतला. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र वाघांची शिकार करण्यासाठी जो बहेली फासकी लावली जाते, त्या प्रकारची फासकी खोडशीत आढळून आल्याने तालुक्यात बिबटय़ाची शिकार करणारी टोळी सक्रीय झाली असल्याची शंका वनविभागाला आहे. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेत वनविभाग, सहय़ाद्रि व्याघ्र प्रकल्प आणि पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडून याचा तपास सुरू आहे.
मंगळवारी सकाळी खोडशी (ता. कराड) येथे कृष्णा नदीकाठी सावकर शिवारात एक वर्षाचा बिबटय़ाचा बछडा शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकला होता. बाळासाहेब पाटील यांच्या गुऱहाळ घरावरील काही लोक मोटर सुरू करण्यासाठी मळीकडे निघाले असताना त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर गावातील पोलीस पाटील राहुल लोंढे यांनी तात्काळ या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनक्षेत्रपाल तुषार नवले व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनविभागाचे सर्व कर्मचारी, वनपाल बाबुराव कदम, सावखंडे, वनरक्षक रमेश जाधवर हे घटनास्थळी पोहोचले. बहेली ट्रपमध्ये अडकलेल्या बछडय़ास जाळी टाकून पकडून नंतर पिंजऱयात घालून सुरक्षित स्थळी हलविले. वनविभागाचे पशुवैद्यकीय डॉक्टर चंदन सवणे यांनी त्यास भुलीचे इंजेक्शन देऊन पायावर उपचार सुरू केले आहेत. पायाचा पंजा तुटला असून जखम खोलवर आहे. हा बछडा एक वर्ष वयाचा असून नर आहे. साधारणातः एक ते दीड वर्ष बछडा मादीबरोबर असतो. त्यानंतर तो मादीपासून बाजूला होऊन शिकारीसाठी फिरतो. त्या वयातील हा बछडा आहे.
बछडा ज्या फासकीत अडकला, त्याची पाहणी केली असता या भागात बहेली ही मध्यप्रदेशात पट्टेरी वाघांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध असणारी बहेली जमात सक्रीय झाली असण्याची शंका वनविभागाला आली. कारण या फासकीला बहेली ट्रप असे म्हणतात. मध्यप्रदेश येथील बहेली जमत ही संपूर्ण भारतात वाघ शिकारीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. ही जमात ज्या पद्धतीने सापळा वापरते, त्याच पद्धतीचा सापळा येथे वापरण्यात आला आहे. त्यामुळे या भागात बहेली शिकारी सक्रीय असल्याची शंका वनविभागाला असून त्यादृष्टीने सहय़ाद्रि व्याघ्र प्रकल्प, एलसीबी यांना कळवून याचा संयुक्त तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच बहेली लोकांच्या शिकारीच्या पद्धतीने स्थानिक कोणी ही शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे का, याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, आपल्या भागात जर संशयास्पद बहेली शिकारी फिरत असतील तर वनविभागास सूचित करावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
ही घटना समजताच खोडशी गावासह परिसरातील गोटे, वनवासमाची, वहागाव आदी ठिकाणच्या नागरिकांनी बछडय़ाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी वनविभागाला पोलीस पाटील राहुल लोंढे, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग चव्हाण, माजी उपसरपंच हणमंत भोपते, सुरेश भोसले, मोहन पाटील, दत्तात्रय पाटील आदींसह ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.
वनअधिकारी व नागरिकांची शाब्दिक चकमक
बछडा जेरबंद करत असताना कोणीही जवळ येऊ नका, फोटो काढू नका अशा सक्त सूचना वनविभागाच्या अधिकाऱयांनी नागरिकांना दिल्या होत्या. मात्र काही नागरिक ऐकत नसल्याने व पुढे पुढे येत असल्याने वन अधिकारी व नागरिक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली.
एका महिन्यात चौथा बिबटय़ा जेरबंद
गेल्या एक महिन्यात येणके, किरपेसह कराड तालुक्यातून बिबटय़ा जेरबंद करण्याची ही चौथी घटना आहे. यापूर्वी वनवासमाची परिसरात मृत बिबटय़ा आढळून आला होता. तर वहागाव परिसरात लोकांना बिबटय़ाचे दर्शन झाले होते. मात्र महामार्गापासून नदीपर्यंत लोकांना बिबटय़ाचे दर्शन कधीही न झाल्याने नागरिक भयमुक्त होते. मात्र आज नदीकाठी बिबटय़ा आढळून आल्याने खोडशी सह परिसरातील वाहगाव वनवासमाची गोटे आदी ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.
बिबटय़ाचा वावर कराडच्या नदीपलिकडे
खोडशी हे गाव कृष्णा नदीकाठी असून खोडशीपासून गोटे, मुंढे, वारूंजी, जुना कोयना पूल अशी सलग ऊसशेती आहे. त्यामुळे नदीकाठी बछडा आढळल्याने कराड शहरालगत वाहणाऱया कोयना आणि कृष्णा नदीच्या पलिकडच्या काठावरील शेतीत बिबट आणि बछडय़ाचा वावर असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने शेतकरी व लोकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.