केवळ 28 विषयांमुळे सभेत गदारोळ होण्याची चिन्हे
प्रतिनिधी/ कराड
येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा 22 रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र ती रद्द करण्यात करण्यात आल्यानंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मंगळवार 28 रोजी ही सभा ऑनलाईन आयोजित केली आहे. सुमारे वर्षानंतर होणाऱया या सभेत केवळ 27 विषय घेतल्याने जनशक्ती, लोकशाहीच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या सभेत गदारोळ होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वसाधारण सभा झाली होती. त्यानंतर केवळ विशेष सभांचे आयोजन करण्यात आले होते. सद्यस्थितीत सुमारे 200 पेक्षा जास्त विषयांची टिपणी तयार असताना नगराध्यक्षांनी केवळ 27 विषयांची सर्वसाधारण सभा 22 रोजी आयोजित केली होती. त्याची नोटीसही नगरसेवकांना देण्यात आली होती. मात्र वैद्यकीय कारणास्तव ही सभा त्यांनी रद्द केली होती. आता पुन्हा मंगळवार 28 रोजी ऑनलाईन पद्धतीने ही सभा होणार आहे.
या सभेत केवळ 27 विषयच घेण्यात आले आहेत. पालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त विषयांना सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक असल्याचे नगरसेवकांचे मत आहे. या विषयावरून सभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे.