डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर यांची माहिती
प्रतिनिधी /कराड
कराड नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक भाजप पक्षाच्या चिन्हावर लढवणार आहे. पालिकेच्या सर्व 33 जागा पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात गुरूवारी सकाळी भाजपा पदाधिकाऱयांची बैठक झाली. त्यामध्ये आगामी नगरपालिका निवडणूक, अध्यक्ष, बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, सुहास जगताप, माजी नगरसेवक मिलिंद पेंढारकर, मुकुंद चारेगावकर, रुपेश मुळे, उमेश शिंदे, तालुकाध्यक्ष धनाजी पाटील आदींची उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष पावसकर म्हणाले, या बैठकीत सर्व भाजप कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानुसार आगामी निवडणुकीत पक्ष चिन्हावर सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या काळात शेखर चरेगावकर, डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून शहरात बैठका घेऊन उमेदवार ठरवण्यात येतील. त्यामध्ये समाजातील कार्य, सामाजिक उपक्रमातील सहभाग व कोरोना आणि महापूर काळात केलेल्या कामावर 50 टक्के उमेदवार ठरवण्याचा फॉर्मुला अवलंबण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गत निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सहा जिंकल्या. तर अन्य ठिकाणी युती केली. मात्र, यावेळी पालिकेला युती करायची की नाही? यावर सदर बैठकीत चर्चा झाली. परंतु सर्व जागा पक्षाच्या चिन्हावर लढवणार असल्याचे पावसकर यांनी सागितले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांनी सत्तेत नसतानाही कसे काम केले, ते कार्यकर्त्यांनी सदर बैठकीत सांगितले. शहरात गेल्या पाच वर्षात नगराध्यक्षांच्या माध्यमातून चांगले काम झाले आहे. त्यामुळे नक्कीच पक्षाची ताकद वाढली असून जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चिन्हावर आगामी पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानी घालणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्याचबरोबर विविध योजनांच्या माध्यमातून सरकारने केलेल्या कामांचा भाजपला आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच फायदा होणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तिजोरीतील खडखडाटाला बहुमत, तत्कालीन प्रशासन जबाबदार
पालिकेच्या जनरल फंडात खडखडाट झाला असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणताच ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर म्हणाले की, तत्कालीन मुख्याधिकारी, प्रशासन, स्थायी व सभागृहात बहुमत असणारे खडखडाटास जबाबदार आहेत. स्वच्छ सर्वेक्षण, विविध कामांसाठी जनरल फंडातून वारेमाप खर्च झाला. त्याला डोळे झाकून पाठिंबा देणारे व बहुमत असणारांनी विचारणा करायला हवी होती. आम्ही विचारणा केल्यास आम्ही विकासाच्या आड येत असल्याचे चित्र निर्माण केले जात होते. बहुमत असणाऱयांनी केवळ लोकप्रियतेसाठी कर सवलत देण्याच्या घोषणा केल्या आहेत.
पाच वर्षात खूप त्रास दिला गेला
गेल्या पाच वर्षात खूप त्रास दिला गेला. शहराच्या हिताची अनेक चांगली कामे मांडली. मात्र ती रोखली गेली. बहुमत असण्याबरोबरच निधीची उपलब्धता होण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षात अल्पमतात कारभार केला. मात्र आगामी निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवून बहुमताने पक्षाची सत्ता यावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी सांगितले.