वार्ताहर/ कराड
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वागत कमानीचे काम सुरू असताना स्वागत कमान ढासळल्याने दोन मजूर गंभीर जखमी झाले. बालाजी सोमनाथ निकाळजे (वय 35, रा. सातारा) व इरफान बंदेनवाब बागवान (वय 25, रा. कराड) अशी गंभीर जखमी झालेल्या मजुरांची नावे आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे बाजार समिती परिसरात गोंधळ उडाला होता.
येथील शनिवार पेठेत कार्वे नाका रस्त्यारवर शेती उत्पन्न बाजार समितीच्या भव्य स्वागत कमानीचे काम गेल्या काही दिवसांपासुन सुरू आहे. त्यासाठी रस्त्यात जवळपास 80 फूट रूंदीचे पायाड बांधण्यात आले आहे. पायाडाच्या वर स्टीलच्या साहाय्याने कमानीचा साचा तयार करण्यात आला होता. बुधवारी कमानीच्या साच्यात काँक्रीट ओतण्याचे काम सुरू होते. सकाळी काम सुरू करतानाच एका मजुराच्या डोक्यात बांधकामासाठी लागणारे लोखंडी साहित्य डोक्यात पडल्याने एक मजूर किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली होती.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कमानीचे काँक्रीट ओतण्याचे काम सुरू होते. यावेळी कमानीच्या वर पाच ते सहा मजूर व कमानीखाली पाच ते सहा मजूर काम करीत होते. कमानीच्या बहुतांश भागातील काँक्रीट ओतण्याचे काम झाले होते. कमानीच्या मध्यावर थोडय़ा भागात काँक्रीट ओतण्याचे काम शिल्लक असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक कमान ढासळली. यामुळे कमानीवरील मूजर कमानीबरोबर खाली ढासळले. यात दोन मजूर गंभीर जखमी झाले तर अन्य चार ते पाच मजूर किरकोळ जखमी झाले. कमान ढासळताना मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपस्थितांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कमानीसाठी वापरलेल्या स्टिलच्या सांगाडय़ासह कमान ढासळल्याने उपस्थितांमधून आश्चर्य व्यक्त होत होते.
लाकडी पायाडामुळे दुर्घटना…
बाजार समितीच्या प्रवेशद्वारात जवळपास 80 फूट लांब व 30 ते 40 फूट उंच अशी भव्य स्वागत कमान उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र कमान बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने लाकडी बांबूचे पायाड उभारले आहे. कमानीसाठी वापरलेले स्टील व ओतण्यात येत असलेल्या काँक्रीटचा बोजा लाकडी पायाडावर न पेलल्याने कमान ढासळल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली. वास्तविक एवढी मोठी कमान उभारत असताना ठेकेदाराने लोखंडी पायाड उभारणे गरजेचे होते. कमानीचे काम सुरू असताना कमानीवर व कमानी खाली असे एकुण 10 ते 12 मजूर होते. तर कमानीच्या परिसरात अनेक नागरिकही ये-जा करीत होते. सुदैवाने कमान पडत असताना मोठा आवाज झाल्याने कमानीखाली उभे असलेले मजूर लांब पळाल्याने मोठी दुर्घटना टळली.