वार्ताहर/कराड :
सुरुवातीपासूनच कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यासह शहरातही कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने शहरातील विविध व्यापारी संघटनांनी 2 ते 8 सप्टेंबर दरम्यान स्वयंस्फूर्तीने कराड लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मात्र या लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर शहरातील रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच वर्दळ दिसून येत आहे.
कराड तालुक्यासह शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येच्या तुलनेत रुग्णालय व डॉक्टरांची संख्या अत्यल्प असल्याने गंभीर रुग्णांनाही बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची साखळी तोडता यावी यासाठी शहरातील विविध व्यापारी संघटनांनी कराड लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, बुधवार व गुरुवार दोन्ही दिवस लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दवाखाने, औषधे, किराणा, दूध व भाजीपाला आदी प्रकारची अत्यावश्यक सेवेतील दुकाने लॉकडाऊनमधून वगळण्यात आली होती. तर सराफ, कापड, चप्पल व अन्य व्यपारी संघटनांनी लॉकडाऊनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात मात्र शहरातील मुख्य बाजारपेठेसह अन्य भागातील अनेक दुकाने सुरू ठेवली असल्याचे चित्र दिसत आहे. आधीच पाच महिन्यांपासून दुकाने बंद राहिल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे काही व्यापाऱयांचे म्हणणे आहे.