जपानी कादंबरीवर चित्रपट तयार करणार सुजॉय घोष
करिना कपूर लवकरच डिजिटल पदार्पण करणार आहे. करिनाने एक व्हिडिओ आणि काही छायाचित्रांसह स्वतःच्या आगामी ओटीटी प्रकल्पाची माहिती दिली आहे. करिनासोबत या प्रोजेक्टमध्ये ‘पाताल लोक’ फेम अभिनेता जयदीप अहलावत आणि विजय शर्मा यासारखे कलाकारही दिसून येतील. करिनाने स्वतःच्या ओटीटी पदार्पणासाठी प्रसिद्ध दिग्दर्शन सुजॉय घोषची निवड केली आहे. घोष यांनी यापूर्वी कहानी, कहानी 2, बॉब बिस्वास, बदला यासारखे चित्रपट तयार केले आहेत.
जपानचे प्रसिद्ध लेखक किइगो हिगाशिनो यांचे पुस्तक ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’वर हा प्रोजेक्ट आधारित असल्याचे करिनाकडून सांगण्यात आले आहे. यात प्रेक्षकांना हत्या, रहस्य आणि रोमांचक गोष्टी पाहायला मिळतील. सुजॉय घोष यांच्या कामाने अत्यंत प्रभावित आहे. त्यांची कार्यपद्धत अत्यंत आवडल्याचे करिनाने म्हटले आहे. 2005 मध्ये प्रकाशित जपानी लेखक किइगो हिगाशिनो यांचे हे पुस्तक जगभरात चर्चेत राहिले होते. या पुस्तकाला अमेरिका, जपानमधील अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. करिना कपूर ही आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.