हंसन मेहतांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट तयार होणार
करिना कपूर स्वतःच्या बॉलिवूडमधील कारकीर्दीत नव्या क्षेत्राचा समावेश करत आहे. अभिनेत्री म्हणून 20 वर्षे काम केल्यावर करिना आता निर्माती होत आहे. तिच्याकडून निर्मित होणारा हा चित्रपट थ्रिलर असून याचे दिग्दर्शन हंसल मेहता करणार आहेत. एकता कपूरसोबत भागीदारी करत करिना या चित्रपटाची निर्मिती करत आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरविण्यात आलेले नाही.
एकतासोबत या चित्रपटात निर्माती म्हणून काम करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. हंसल मेहता यांच्या चित्रपटांचे मी नेहमीच कौतुक करत आले आहे. त्यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करणे विशेष ठरणार असल्याचे करिनाने म्हटले आहे.
या चित्रपटाद्वारे एक मनोरंजक आणि मूडी थ्रिलर कथानक सादर करण्याचा आमचा उद्देश आहे. करिना एक अभिनेत्री म्हणून स्वतःच्या प्रतिभेसोबत न्याय करेल अशी अपेक्षा आहे. एकता आणि करिना दोघींनीही स्वतःच्या कारकीर्दीत बरेच काही साध्य केले असल्याचे हंसल मेहता म्हणाले. या चित्रपटात करिना मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्याचे समजते. लवकरच याचे चित्रिकरण सुरू केले जाणार आहे. हंसल मेहता दिग्दर्शित ‘फराज’ चित्रपटातून करिनाचा चुलत भाऊ आणि शशी कपूर यांचा नातू जहान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर एकता कपूरकडून निर्मित वीरे दी वेडिंग चित्रपटात करिनाने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. तर करिना लवकरच आमिर खानसोबत लाल सिंह चड्ढा चित्रपटातून झळकणार आहे.