वृत्तसंस्था/ कँडी
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱया दिवशी कर्णधार करुणारत्ने आणि थिरिमने यांच्या अर्धशतकांमुळे लंकेचा पहिला डाव सावरला. दिवसअखेर लंकेने 3 बाद 229 धावा जमविल्या. तत्पूर्वी बांगलादेशने आपला पहिला डाव 7 बाद 541 घोषित केला. लंकेचा संघ 312 धावांनी पिछाडीवर असून बांगलादेशची स्थिती मजबूत आहे.
बांगलादेशने 4 बाद 474 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांनी 173 षटकाअखेर 7 बाद 541 धावावर डावाची घोषणा केली. त्यांच्या तीन फलंदाजांनी 67 धावांची भर घातल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराने डावाची घोषणा केली. बांगलादेशच्या डावात नजमूल हुसेनने 1 षटकार आणि 17 चौकारांसह 163 तर कर्णधार मोमिनूल हकने 11 चौकारासह 127, तमिम इकबालने 15 चौकारासह 90, मुशफिकूर रहिमने 6 चौकारासह नाबाद 68 आणि लिटॉन दासने 1 षटकार आणि 5 चौकारासह 50 धावा जमविल्या. लंकेतर्फे विश्वा फर्नांडोने 96 धावात 4 तर लकमल, कुमारा आणि डिसिल्वा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
कर्णधार करुणारत्ने आणि थिरिमने या सलामीच्या जोडीने लंकेच्या डावाला दमदार सुरुवात करून देताना 114 धावांची भागीदारी केली. थिरिमनेने 8 चौकारासह 58 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेचे दोन फलंदाज लवकर बाद झाले. ओ फर्नांडोने 4 चौकारासह 20 तर मॅथ्यूजने 4 चौकारासह 25 धावा जमविल्या. कर्णधार करुणारत्ने 8 चौकारासह 85 तर धनंजय डिसिल्वा 4 चौकारासह 26 धावावर खेळत आहेत. बांगलादेशतर्फे टी. अहमद, मेहदी हसन आणि टी. इस्लाम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश प. डाव 173 षटकात 7 बाद 541 डाव घोषित (नजमूल हुसेन 163, मोमिनूल हक 127, तमिम इकबाल 90, मुशफिकूर रहिम नाबाद 68, दास 50, व्ही. फर्नांडो 4-96, लकमल, कुमारा, डिसिल्वा प्रत्येकी एक बळी)
लंका प. डाव 73 षटकात 3 बाद 229 (करुणारत्ने खेळत आहे 85, थिरिमने 58, ओ. फर्नांडो 20, मॅथ्यूज 25, डिसिल्वा खेळत आहे 26, टी. अहमद, टी. इस्लाम, मेहदी हसन प्रत्येकी एक बळी).