ऑनलाईन टीम / बीड :
सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱया करुणा शर्मा यांना बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे जाहीर करण्याचा इशारा देऊन करुणा शर्मा रविवारी परळीत दाखल झाल्या. त्यावेळी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्यांच्या वाहनचालकास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शर्मा यांनी या प्रकरणात तपासाला सहकार्य करण्यास तयार असून, आपल्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी याचिकेतून केली आहे.