अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये राहणारा डस्टिन वाइटल सध्या अत्यंत आनंदी आहे. वर्षाच्या अखेरीस इजिप्तमध्ये पिरॅमिड पहायला जाण्याची तयारी त्याने आतापासूनच सुरू केली आहे. पण याचे कारण भावुक करणारे ओह. डस्टिनची आई ग्लोरिया यांना ब्लॅडरचा कर्करोग असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. डस्टिन दररोज स्वतःच्या नोकरीसह आईची देखभाल, औषधे आणि स्वयंपाक त करण्यापासून अन्न भरविण्याचे काम करतो.
मागील वर्षी त्याच्या आईला कर्करोग झाल्याचे निदान झाले. ती अधिककाळ जगू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. ग्लोरियाचे सर्वात मोठे स्वप्न पिरॅमिड पाहण्याचे आहे. पण कुटुंबाचा दैनंदिन खर्च उचलणेच अवघड असल्याचे इजिप्त जाण्याचे स्वप्न अधुरेच राहिले असते. पण शालेय शिक्षक असलेला डस्टिन या स्वप्नाची पूर्ती करविणार आहे.
डस्टिनने आईच्या आजारपणात हिंमतीने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत चालविली आहे. पगारातून हे स्वप्न पूर्ण करता येणार नसल्याने डस्टिनने आईकडून पाककला शिकून घेतली. त्याने बटर, चीज सँडविचपासून सुरुवात करत काही मित्र आणि नातलगांना ते पुरविले. त्यांच्यामार्फत अन्य लोकांपर्यंत माहिती पोहोचल्यावर डस्टिनच्या खाद्यपदार्थांची मागणी वाढली आणि काही दिवसांमध्येच त्याच्या घराबाहेर कार आणि ग्राहकांची रांग लागू लागली.
जागा कमी पडू लागण्याची स्थिती आली आहे. याचदरम्यान एका फूड ट्रकच्या मालकाने त्याला ट्रकचा वापर करू दिला. त्यानंतर तर डस्टिनचे नशीबच चमकले आहे. त्याने अधिक मेहनत करत सुमारे 8-10 आठवडय़ांमध्येच संपूर्ण कुटुंबाच्या इजिप्त दौऱयाचा सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चाची तजवीज केली आहे. याचबरोबर त्याने 18 हजार डॉलर्स (सुमारे 13 लाख रुपये) अतिरिक्त कमाविले आहेत.
ग्लोरिया, डस्टिन आणि त्याच्या कुटुंबाचे 12 सदस्य चालू वर्षाच्या अखेरीस इजिप्तला जाणार आहेत. माझ्याइतकी सुदैवी तर इजिप्तची राजकन्या क्लियोपात्राही राहिली नसेल असे उद्गार ग्लोरिया यांनी काढले आहेत. माझ्या आईने जर चंद्रावर जाण्याचे स्वप्न पाहिले असते तर ते देखील पूर्ण केले असते असे विधान डस्टिनने केले आहे.