आज १ जानेवारी बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा वाढदिवस.सोनालीनं आपलं सुंदर व्यक्तिमत्व आणि सालस अभिनयाद्वारे चाहत्यांची पसंती मिळवली आहे. चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ती मॉडेल होती. सोनालीने वयाच्या १९ व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. तिने १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डमध्ये ‘न्यू फेस ऑफ द इअर’ हा अवॉर्ड देण्यात आला होता.
सोनालीची खरी ओळख १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिलजले’ या चित्रपटाने झाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सोनालीसह अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यानंतर सोनालीने सुनील शेट्टीसोबत ‘भाई’, आमिर खानसोबत ‘सरफरोश’ आणि शाहरुखसोबत ‘डुप्लीकेट’ हे हिट चित्रपट दिले. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात सलमान खान बरोबर अत्यंत सालस आणि नाजूक अशी भूमिका तिने केली आहे . पण यानंतर काही काळ सोनाली चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. सन २०१८ मध्ये सोनालीला कर्करोगाचा सामना करावा लागला होता. कर्करोगावर उपचार घेण्यासाठी सोनाली न्यूयॉर्कला गेली होती. कॅन्सर झाल्याची माहिती देखील तिने स्वत: सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली होती. काही दिवसानंतर सोनाली कर्करोगावर मात करुन पुन्हा भारतात परतली. सोनालीने या काळातले तिचे बरेच फोटो शेअर केलेले आहेत.