प्रतिनिधी / मुंबई
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रायगड जिह्यातील कर्जत आणि अलिबागसाठी दोन व्हेंटिलेटर्स रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे नुकतेच सुपूर्द करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात व्हिडिओ माध्यमाद्वारे हे व्हेंटिलेटर्स सुपूर्द करण्यात आले. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्यावतीने शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला. याप्रसंगी माजी नगरसेवक सुनील अहिर, सेक्रेटरी संजय कदम उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने कोरोनाविरुद्ध जो लढा उभा केला आहे, त्याला युनियनने सर्वतोपरी सहकार्य करण्याचा संकल्प केला आहे, असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि टाटा स्टीलच्यावतीने पालघर जिह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडेही कोरोनामुक्तच्या लढय़ाला सहकार्य म्हणून व्हेंटिलेटर सुपूर्द केले आहे.