व्याजावरील व्याज केंद्र सरकारने केले माफ : नियमित ईएमआय भरणाऱयांना ‘कॅश बॅक’
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऐन दसरा-दिवाळीमध्ये केंद्र सरकारने व्याजावरील व्याज (चक्रवाढ व्याज) माफ करत कर्जदारांना ‘सोनेरी लाभ’ दिला आहे. मोरेटोरियम म्हणजे कर्ज स्थगित कालावधीतील ईएमआयबाबत व्याजमाफीची मार्गदर्शक तत्त्वे सरकारने जारी केली आहेत. पात्रता निकषानुसार, कर्ज देणाऱया संस्थांच्या माध्यमातून हा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या गृह, शिक्षण, पेडिट कार्ड थकबाकी, वाहन, वैयक्तिक कर्ज यांचा समावेश आहे. तसेच मोरेटोरियम सुविधेचा फायदा न घेता नियमित हप्ते भरणाऱयांनाही व्याजाच्या रकमेचा ‘कॅश बॅक’ मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने बुधवारी 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यांच्यातील फरकासाठी अतिरिक्त रक्कम म्हणून देयसंबंधी मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी दिली आहे. केंद्राने मंजूर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, वित्तीय संस्था आणि बँका स्थगित व्याज आणि साधारण व्याजदरातील फरकाची रक्कम योग्य कर्जदारांच्या कर्ज खात्यात जमा करेल. याचा फायदा रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या मोरेटोरियम योजनेचा अंशतः किंवा पूर्ण फायदा घेतलेल्या कर्जदारांना होईल.
लॉकडाऊन काळात सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने रिझर्व्ह बँकेकडून कर्जदारांना बँकेचे हप्ते न भरण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, अशा कर्जदारांना या काळातील व्याजावर चक्रवाढ व्याज आकारणार असल्याचे बँकांनी स्पष्ट केले होते. बँकांच्या या धोरणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली गेली. बँकांच्या या धोरणामुळे तर नियमित हप्ते भरणाऱया कर्जदारांनाही चक्रवाढ व्याजाचा फटका अकारण सहन करावा लागणार होता. याप्रकरणी न्यायालयाने दटावल्यानंतर सरकारने चक्रवाढ व्याज न घेण्याचा निर्णय जाहीर केला. ज्या कर्जदारांनी 2 कोटी रुपयांपर्यंतच्या गृह, वाहन, वैयक्तिक, उद्योग, शिक्षण, पेडिट कार्ड अशाप्रकारचे कोणतेही कर्ज हप्ते माफीच्या काळात थकीत असले तरी त्यावर चक्रवाढ व्याज न घेण्याचे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आरबीआयने लागू केलेल्या दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदरावर व्याजमाफी योजनेची लवकर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
कर्ज खात्यात जमा होतील पैसे…
अर्थ मंत्रालयाने व्याजातून सूट मिळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिल्यामुळे आता बँका आणि वित्तीय संस्था संबंधित कर्जदाराच्या कर्ज खात्यात पैसे जमा करतील. बँकांना हा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त होईल. सरकार दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील केवळ चक्रवाढ व्याज जमा करणार आहे. या व्याजावरील व्याज माफ केल्यामुळे तिजोरीवर 6 हजार 500 कोटी रुपयांचा भार पडेल.
…यांना मिळणार सुविधेचा लाभ !
वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्या कर्जदारांवर 29 फेब्रुवारीपर्यंत एकूण कर्ज 2 कोटींपेक्षा जास्त नाही, ते कर्जधारक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. या योजनेंतर्गत गृह, शैक्षणिक, पेडिट कार्डची थकबाकी, वाहन कर्जे, एमएसएमई (मायक्रो, लघु व मध्यम उद्योग), टिकाऊ ग्राहक साहित्यासाठी कर्ज आणि वापरासाठीच्या कर्जांचा समावेश असणार आहे. तसेच हा फायदा 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीसाठी आहे.