महापालिका नोकर संघटनेचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध सोसायटय़ांमध्ये कर्जावर 10 ते 11 टक्के दराने व्याज आकारले जाते. मात्र, महापालिका नोकर सहकारी पेडिट सोसायटीमध्ये 14.5 टक्के दराने कर्जावर व्याज आकारले जाते. त्यामुळे या व्याजदरात कपात करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बेळगाव महापालिका एम्प्लॉईज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन मल्लिकार्जुन गुंडप्पण्णावर यांना देण्यात आले.
सोसायटीच्या भागधारकांनी कर्ज घेतल्यास खातेदारांकडून विनंतीनुसार सोसायटीच्यावतीने कर्जाचे हप्ते वजा करून घेतले जातात. ही रक्कम जास्त असल्याने हप्त्याची रक्कम कमी घेण्यात यावी. सोसायटीच्या काही भागधारकांचा मृत्यू झाला आहे. त्यांची कर्जवसुली रखडली आहे. अशा कर्जदारांकडून व्याजासहीत कर्जाची वसुली करण्यात यावी. सोसायटीच्या सेवा व्यवस्थित उपलब्ध करण्यात याव्यात, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे महापालिका नोकर संघटनेच्यावतीने करण्यात आल्या आहेत. सदर निवेदन सोसायटीच्या चेअरमनना देण्यात आले असून, यावेळी महापालिका नोकर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.