कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचीं माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत गट कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज गटांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 10 लाख आणि बीज भांडवल कर्ज योजनेमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर यांनी दिली.
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. बीज भांडवल कर्ज योजना. या योजनेमध्ये कर्जाची मर्यादा पाच लाख रुपये असून कर्जाची मुदत पाच वर्षे आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहाभाग 75 टक्के तर लाभार्थ्यांचा सहभाग 5 टक्के आहे. महामंडळाच्या कर्ज रकमेवर सहा टक्के व्याज आकारले जाते व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेच्या नियमानुसार व्याज आकारणी केली जाते. या योजनेंतर्गत कर्ज जिल्हा कार्यालय येथे उपलब्ध आहे. सन 2020-21 या वर्षाकरिता बीज भांडवल योजनेचे भौतिक उद्दिष्ट 65 असून आर्थिक उद्दिष्ट 49 लाख रुपये आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. या योजनेंतर्गत 10 लाख रुपये इतक्मया कर्जाची मर्यादा असून ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. सन 2020-21 या वर्षाकरिता भौतिक उद्दिष्ट 160 असून आर्थिक उद्दिष्ट 182.40 लाख रुपये आहे. यामध्ये व्याज परताव्याची रक्कम आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास 12 टक्केपर्यंतचे व्याज लाभार्थीच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे. योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर व्याज परतावामध्ये नाव नोंदणी करून सादर करायचे आहेत.
गट कर्ज परतावा योजना. ही योजना गटांसाठी असून या योजनेची मर्यादा 50 लाख रुपये इतकी आहे. गटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सन 202-21 या वर्षाकरिता भौतिक उद्दिष्ट 30 असून आर्थिक उद्दिष्ट 172.50 लाख रुपये आहे. व्याज परताव्याची रक्कम ही या योजनेमध्ये समाविष्ट आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास 12 टक्के पर्यंतचे व्याज लाभार्थ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे. योजनेसाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबसाईटवर ‘व्याजपरतावा’ मध्ये नाव नोंदणी करुन सादर करायचे आहे.
थेट कर्ज योजना. या योजनेत कर्जाची मर्यादा एक लाख रुपये असून मुदत चार वर्षांची आहे. महामंडळाकडून ही योजना बिनव्याजी असून मुदतीत कर्ज भरल्यास चार टक्के व्याजदर आकारण्यात येतो. या योजनेकरिता वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अट एक लाख रुपये आहे. तसेच अर्जदाराचा सिबील स्कोर कमीत कमी 500 असणे आवश्यक आहे. सन 2020-21 या वर्षाकरिता बीज भांडवल कर्ज योजनेचे भौतिक उद्दिष्ट 120 असून आर्थिक उद्दिष्ट 120 लाख रुपये देण्यात आले आहे.
या सर्व कर्ज योजनांच्या अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, फोन क्र. 02362-228119 येथे संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर यांनी केले आहे.