वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
क्रिकेट न्यूझीलंडतर्फे देशातील दर्जेदार कामगिरी करणाऱया क्रिकेटपटूंचा पुरस्कार देवून गौरव केला जातो. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सनने आपल्या कामगिरीच्या जोरावर चौथ्यांदा सर रिचर्ड हॅडली पदक पटकाविले आहे. त्याचप्रमाणे क्रिकेट न्यूझीलंडतर्फे कर्णधार विल्यम्सनची 2020-21 सालातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली.
2020-21 च्या क्रिकेट हंगामात क्रिकेटच्या विविध प्रकारामध्ये दर्जेदार कामगिरी करणाऱया न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंचा गौरव करण्यात आला. देवॉन कॉनवेची वनडे आणि टी-20 प्रकारातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. कर्णधार विल्यम्सनने आपल्या दर्जेदार फलंदाजीच्या जोरावर दोन पुरस्कार मिळविले. त्याने सर रिचर्ड हॅडली पदकाबरोबरच रेडपाथ चषकही मिळविला. विल्यम्सनने चार डावामध्ये 159 धावांच्या सरासरीने एकूण 639 धावा जमविल्या. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत त्याने चौथ्यांदा हा पुरस्कार मिळविला आहे.
आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत विल्यम्सनने पहिले स्थान मिळविले आहे. विंडीज विरूद्धच्या हॅमिल्टन येथे झालेल्या सामन्यात त्याने 251 धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडच्या कॉनवेने पुरूषांच्या वनडे आणि टी-20 प्रकारात 2020-21 च्या हंगामातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा पुरस्कार मिळविला आहे. डावखुऱया कॉनवेने टी-20 प्रकारात चार अर्धशतकांसह 473 धावा जमविल्या. तसेच वनडे क्रिकेटमध्ये त्याने तीन सामन्यांतून 225 धावा जमविल्या असून गेल्या मार्चमध्ये बांगलादेशविरूद्धच्या वनडे सामन्यात त्याने आपले पहिले शतक झळकविले.
महिलांच्या विभागात ऍमेलिया केरने ड्रीम 11 सुपर स्मॅश आणि टी-20 असे पुरस्कार मिळविले आहेत. सॅटरवेटने वनडे प्रकारातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून पुरस्कार मिळविला आहे,. मंगळवारी क्रिकेट न्यूझीलंडतर्फे आयोजिलेल्या या पुरस्कार वितरण समारंभात न्यूझीलंडचा माजी फलंदाज जेफ क्रो याचा बर्ट सटक्लीफ पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. जेफ क्रोने 1983 ते 1990 या कालावधीत 39 कसोटी आणि 75 वनडे सामन्यांत न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले असून त्याने 22 सामन्यात कर्णधारपदही भूषविले आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याची न्यूझीलंड संघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली होती.