वृत्तसंस्था/ अबु धाबी
संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला षटकांची गती राखता न आल्याने स्पर्धा आयोजकांनी 12 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.
गेल्या मंगळवारी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील झालेल्या सामन्यावेळी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना षटकांची गती राखता आली नाही. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला 57 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आयपीएलच्या हंगामातील राजस्थान संघाकडून हा पहिला गुन्हा नोंदविला गेल्याने कर्णधार स्मिथला 12 लाख रूपयांचा दंड द्यावा लागणार आहे.