कोरोना संकटाच्या या काळात आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये महापालिका आयुक्त एक महिन्याच्या बाळासह कामावर रुजू झाल्या आहेत. विशाखापट्टणमच्या महापालिका आयुक्त सृजना यांनी एक महिन्यापूर्वी मुलाला जन्म दिला होता. परंतु याचदरम्यान कोरोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली. या काळात विशाखापट्टणम सारख्या महानगरात आयुक्ताची अत्यंत अधिक गरज भासत होती. सृजना यांनी जबाबदारी ओळखून कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाला पती तसेच आईकडे सोडून दररोज त्या कामावर हजर होत आहेत. आयुक्त स्वच्छतेच्या कामकाजाची देखरेख करत आहेत.
माझेही योगदान आवश्यक
नवजाताला आईची गरज असते, परंतु मी वैयक्तिक गोष्टींना बाजूला ठेवले आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा आदेश आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नशील आहोत. महामारी रोखण्यासाठी माझेही योगदान असावे, याकरता स्वच्छतेसह लोकांना शुद्ध पेयजल उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे सृजना यांनी म्हटले आहे.
मध्यप्रदेश : 450 किमीची पायपीट
उत्तरप्रदेशच्या कानपूरचे रहिवासी असलेले आनंद पांडे मध्यप्रदेश पोलीस विभागात कार्यरत आहेत. सद्यकाळात ते जबलपूर शहरात तैनात आहेत. परंतु 20 फेब्रुवारी रोजी पत्नीच्या उपचारासाठी रजा घेऊन ते गावी पोहोचले होते. याच काळात टाळेबंदी लागू झाली तसेच पांडे यांची रजाही संपुष्टात आली. कामावर परतू पाहणाऱया आनंद यांना प्रवासाची साधने उपलब्ध होत नव्हती. परंतु त्यांनी हार न मानता 30 मार्च रोजी कानपूरमधून पायी प्रवास सुरू केला. जबलपूर येथे पोहोचण्यास त्यांना 3 दिवसांचा कालावधी लागला आहे. पोलीस अधीक्षकांनी आनंद यांचे कौतुक केले आहे.