आई-वडील व सासू यांची शिकवण, सासऱ्यांची प्रेरणा आणि पतींकडून मिळाला पाठिंबा. या सर्वांच्या ताकतीवर त्यांनी राजकारणात आपले वेगळी वलय निर्माण केले आहे. घरची व मोठय़ा सूनेची जबाबदारी सांभाळत सातारा जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण सभापती व खटाव पंचायत समितीचे सभापतीपद यशस्वीपणे सांभाळणाऱ्या कल्पना नंदकुमार मोरे यांनी राजकारणात उत्तुंग भरारी घेतली आहे. नंदकुमार मोरे यांच्या सौभाग्यवती कल्पना मोरे यांचे माहेर सांगली जिल्ह्यातील खेराडे वांगी. वडील भाऊसाहेब बाबुराव सुर्यवंशी हे खेराडे वांगीचे सरपंच. त्यांना राजकीय व सामाजिक आवड. त्यांच्याकडून राजकीय वारसा घेवून आलेल्या व निमसोड गावातील राजकारणातील दिग्गज महादेव बाळू मोरे (आप्पा) यांच्या प्रतिष्ठित राजकीय घराण्यात सून म्हणून आलेल्या कल्पना मोरेंनी तो वारसा जतन केला. नंदकुमार मोरे (दादा) यांच्या खंबीर पाठींब्यावर कर्तृत्वाच्या जोरावर वारसा पुढे चालविला.
आज महिलांच्या कर्तृत्वकक्षा रुंदावत आहेत. महिलांनी आपल्या कौशल्याने अनेक शिखरे काबीज केली आहेत. नंदकुमार मोरे (दादा) यांच्या परिवारात आलेल्या कल्पनाताईंनी आपल्या धाडसाने राजकारणात खुप सुंदर कामकाज केले. या जगात अश्यक्य असे काही नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असा. आपले काम मनात उर्मी बाळगून व स्वत:वर विश्वास ठेवून व आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांच्या उपयोगी यावे ही धारणा मनात बाळगल्यास यश दूर नसते. या विचाराने प्रेरित असलेल्या कल्पना मोरे यांनी आपलेप्रती काम यशस्वी केले. निमसोडच्या मोरे परिवारातील सर्वात मोठी सून ही नातेसुध्दा त्यांनी जपले. घरच्या जबाबदाऱया, संस्कार सांभाळत सातारा जिल्हा सभापतीपदाची जबाबदारी त्यांनी लिलया पेलली. त्यांच्या काळातील सायकल वाटप, शिलाई मशिन वाटप, आटाचक्की वाटप, इतर योजनांचा लाभ गरजू लोकांना देण्याचा एक उच्चांक त्यांच्या नावावर आहे. दिवसभराच्या धावपळीत असताना स्वत:ला वेळ देणे महिलांना जमत नाही. स्वास्थ्यपूर्ण जगण्यासाठी स्वत:ला वेळ दिला गेला पाहिजे यासाठी कल्पना मोरे यांनी समाजातील महिलांना जागृत केले. सर्व महिलांनी आरोग्यासाठी पाऊन तास दिलाच पाहिजे असे त्यांचे मत आहे. महिलांनी करिअर जरुर करावे. पण फॅन्टीसीच्या मागे लागू नये. पतीला मदत करुन संसार सांभाळून महिला कोणत्याही गोष्टीत यशस्वी होवू शकतात. हे कल्पना मोरे यांनी दाखवून दिले. खटाव तालुक्याच्या सभापतीपदाचा त्यांचा कार्यकाल उत्तुंग कामाने सर्वांच्या लक्षात राहील असा झाला.
आपल्या सभोवतालच्या मर्यादांच्या भिती पाहून महिलांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला हवे. कोणतेही काम करताना त्यात अनेक अडचणी येतात. त्याचा सामना करावा लागतो. हे खरे पण त्याचा बाऊ न करता आपले काम प्रामाणिक करत राहिल्यास यश हे मिळतेच. या भावनेतून महिला बचत गटाचे मेळावे. घेऊन महिलांना सक्षम करण्याचे काम त्यांनी केले. आत्मविश्वास, आकांक्षा, चिकाटी व कामाची उर्मी याद्वारे प्रगतीची दारे खुली करण्यास महिला सक्षम असतात हे त्यांनी सिध्द केले.
महिलांमध्ये धाडस असले पाहिजे. सकारात्मक विचारातून महिला असामान्य बनू शकते. साधी गृहिणी सुध्दा ध्येय ठेवल्यास मोठे कर्तृत्व करु शकते. हे संकल्पना मोरे यांनी समाजास दाखवून दिले.
शब्दांकन : चंद्रकांत मोरे
(संचालक: प्राथमिक शिक्षक बँक)
संकलन : धनंजय क्षीरसागर, वडूज.