बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय अन्वेषण विभागाने मंगळवारी कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील केंद्रीय उत्पादन शुल्क व केंद्रीय कर (जीएसटी) अधिकाऱ्यास लाच मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची ओळख जितेंद्र के. डागुर अशी आहे. तो उत्तर कन्नड (कारवार) मधील होन्नवर परिक्षेत्रात जीएसटी अधीक्षक म्हणून कार्यरत होता. मध्यवर्ती एजन्सीने सापळा रचला असता हा अधिकारी लाच घेताना पकडला गेला.
“आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती, असा आरोप आहे की आरोपींनी कर परताव्यावरील सेवा कर व दंड माफ करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजाराची लाच मागितली. वाटाघाटी केल्यावर आरोपीने दोन हप्त्यांमध्ये ती रक्कम स्वीकारण्यास मान्य केले, असा आरोपही करण्यात आला आहे, ”असे या कारवाईत सहभागी सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले.