बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांना बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गृहमंत्र्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
ट्विटच्या माध्यमातून गृहमंत्री बोम्मई यांनी याविषयी माहिती देताना आमच्या घरात काम करणाऱ्या मुलांना मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तपासणीनंतर त्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या पार्श्वभूमीवर माझी तपासणीही झाली आहे आणि मलाही कोरोना संसर्ग झाला आहे, परंतु माझ्यामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत, मी निरोगी आहे आणि घरी इतरांपासून अलग राहत आहे. तसेच इतर भाजपा नेत्यांनी त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या सर्वांना त्वरित चाचणी करून घ्यावी आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले त्यांनी केले आहे.