बेंगळूर/प्रतिनिधी
बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान, मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. किशन रेड्डी यांनी आज विधिमंडळाची बैठक घेत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. नवीन मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्माई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी अनेक नवे चर्चेत होती. काहींनीतर उघडपणे मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. पण अखेर पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयानुसार बसवराज बोम्माई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर वर्णी लावली.
यापूर्वी सोमवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईपर्यंत मुख्यमंत्री म्ह्णून काम सुरू ठेवण्यास सांगितले होते. आता लवकरच नवीन मुख्यमंत्री मंत्रिपदाची शपथ घेऊन कामाला सुरुवात करतील.