ऑक्सफोर्ड स्टुडंट युनियनची अध्यक्ष होणारी पहिली भारतीय महिला
वृत्तसंस्था / मणिपाल
कर्नाटकातील मणिपाल येथील रश्मी सामंत ऑक्सफोर्ड स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपदी निवडून आली आहे. लंडनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात हे पद प्राप्त करणारी रश्मी पहिली भारतीय विद्यार्थिनी ठरली आहे. मणिपाल इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माजी विद्यार्थिनीला उर्वरित उमेदवारांच्या एकूण मतांपेक्षाही अधिक मते मिळाली आहेत.
रश्मी सामंत ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लिनकेयर कॉलेजमध्ये एनर्जी सिस्टीम्समध्ये एमएससीची विद्यार्थिनी आहे. रश्मीने चार मुख्य प्राथमिकतांना केंद्रस्थानी ठेवून अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली, ज्यात तिला घवघवीत यश मिळाले आहे.
साम्राज्यवाद्यांचे पुतळे हटविण्याची भूमिका
स्वतःच्या घोषणापत्रानुसार रश्मी विद्यापीठ आणि कॉलेज कान्फरन्समधून साम्राज्यवादी राहिलेल्या सर्व व्यक्तिमत्वांचे पुतळे हटविण्याची भूमिका मांडणार आहे. यात ख्रिस्तोफर कॉडरिंगटन यांचाही समावेश आहे.
1966 मते
रश्मीला अध्यक्षपदासाठी पडलेल्या एकूण 3708 मतांपैकी 1966 मते प्राप्त झाली आहेत. यंदा ऑक्सफोर्डच्या निवडणुकीत विक्रमी 4881 मतांनी मतदान केले आहे. सर्व वर्गवारीत एकूण 36,405 मते पडली आहेत.
वडिल व्यावसायिक, आई गृहिणी
वत्सला आणि दिनेश सामंत यांची कन्या असलेल्या रश्मीने मणिपाल आणि उडुपी येथे शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे वडिल परकलामध्ये व्यावसायिक असून आई गृहिणी आहे. रश्मीने मणिपाल इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, (2016-2020 तुकडी) मणिपालमधून पदवी मिळविली आहे. रश्मी एमआयटी, मणिपालमध्ये विद्यार्थी परिषदेचे तांत्रिक सचिव होती.