कन्नडीगांच्या हुकमशाही विरोधात शिवसेना आक्रमक
प्रतिनिधी / कोल्हापूर
कर्नाटकच्या वाहनांना शिवसेनेने उद्या (शनिवारी) महाराष्ट्रात प्रवेशबंदी केली आहे. तरीही कोणतेही वाहन महाराष्ट्रात दाखल झाल्यास त्याला सेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. तर शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावर उचगांवनजीक कर्नाटक पासिंगची वाहने शिवसैनिकांनी रोखून धरली. त्या वाहनांवर जय महाराष्ट्र लिहून ती वाहने पुढे सोडण्यात आली. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बेळगांव महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज न हटविल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.
याप्रसंगी बोलताना पवार म्हणाले, बेळगांव महापालिकेसमोर कन्नड रक्षक वेदिकेने अनधिकृतरित्या लाल-पिवळा ध्वज उभारला आहे. हा झेंडा हटविण्याची सर्वस्वी जबाबदारी कर्नाटक सरकारची आहे. मात्र ध्वज हटविण्याऐवजी कन्नड वेदिकेच्या गुंडान फुस देण्याचे काम येथील सरकार करत आहे. ध्वज उभारून कर्नाटक सरकार एक प्रकारे मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रकार शिवसेना कधीही खपवून घेणार नाही. मराठी भाषिकांच्या पाठीशी शिवसैनिका ठाम पणे उभा राहणार आहे. कर्नाटक सरकारने हा ध्वज त्वरीत हटवावा अन्यथा हे आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशारा पवार यांनी दिला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, युवासेना जिल्हाध्यक्ष मंजीत माने, शशीकांत बिडकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
अन्याय थांबवा अन्यथा चोख प्रत्त्यूतर देवू
कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांवर अजुनही अन्याय करत आहे. मात्र हा अन्याय आता खपवून घेतला जाणार नाही. कर्नाटकला चोख प्रत्त्यूत्तर दिले जाणार आहे. उद्या (शनिवारी) कर्नाटकातील वाहनांना प्रवेशबंदी करणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व सातारा जिल्ह्यातील सर्व कानडी व्यवसायिकांचे सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.
कर्नाटकच्या निषेधार्थ उद्या (शनिवारी) निदर्शने
सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्याया विरोधात आवाज उठविण्यासाठी उद्या (शनिवारी) वाहनांना प्रवेश बंदी तसेच सर्व कानडी लोकांचे व्यवसाय बंद ठेवणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी साडे आकरा वाजता कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करुन या आंदोलनाला सुरवात करणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख पवार यांनी दिली.