बेंगळूर/प्रतिनिधी
देशात आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या वतीने राज्यांमध्ये जन आशीर्वाद यात्रा काढल्या जात आहेत. केंद्रात मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात असलेले मंत्री ही जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. आज मुंबई येथून नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. दरम्यान, कर्नाटकातही जन आशीर्वाद यात्रा काढली जात आहे. कर्नाटकात निघालेल्या भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान हवेत गोळीबार केला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यादगीर येथे मंगळवारी यात्रेमध्ये हवेत गोळ्यांचे काही राऊंड झाडण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चार बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन बंदुका परवानाधारक असून इतर दोन बंदुकांची तपासणी सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, २२ राज्यांमध्ये भाजप कडून जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेत ३९ केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत.
दरम्यान, राज्यामध्ये भाजप नेते जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. यावेळी ढोल-ताशा वाजवून भाजपाने यात्रा काढली होती. यावेळी माजी मंत्री बाबाराव चिंचांसूर बंदूक घेऊन पोज देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. केंद्रीय मंत्री भगवंत खुंबा यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या यात्रेत केंद्रात नवीन मंत्री झालेल्यांची ओळख करून देण्यात आली. कर्नाटकमधून चार भाजप नेत्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी, पशुसंवर्धन राज्यमंत्री एल. मुरुगन, कृषी राज्यमंत्री शोभा करंदळजे आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री भगवंत खुबा यांचा समावेश आहे.