बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेढ्यात असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. दरम्यान पंतप्रधानांनी घेतलेल्या बैठकीत त्यांनी राज्यांना अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कर्नाटकला अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवण्याच्या राज्य सरकारच्या विनंतीस अनुसरून केंद्राने शनिवारी दररोज ६०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन वाटप करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी नमूद केले.
ट्विटरवर येडियुरप्पा यांनी वाटप क्षमता वाढविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांचे आभार मानले. सध्या ऑक्सिजनचे दररोज ३०० मे.टन वाटप होते आणि ते ८०० मे.टन करण्यात आले आहे, असे येडीयुरप्पा म्हणाले.
त्याचबरोबर ३० एप्रिलपर्यंत रेमडेसिवरचा पुरवठाही ५० हजारवरून वरून १.२२ लाख करण्यात आला आहे, असे त्यांनी ट्विट केले.
शुक्रवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ऑक्सिजनची तीव्र कमतरता भासत असल्याचे सांगितले आणि म्हटले होते की केंद्राने अतिरिक्त ऑक्सिजन न दिल्यास अनेक आरोग्य सुविधा बंद करावी लागतील.
दरम्यान, एक दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी सर्व डीसींशी बैठक घेऊन आपापल्या जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सतर्क करण्याचे निर्देश दिले.
कोणत्याही किंमतीत ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची काळजी डीसींनी घ्यावी लागेल. या संदर्भात माहिती देण्यासाठी ते जिल्हा प्रभारी मंत्री किंवा स्वत: मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकतात, असे येडियुरप्पा म्हणाले.