बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या दौऱ्यात राज्यातील समस्येविषयी केंद्रीय मंत्र्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोग्यमंत्र्यांना कर्नाटकाला दररोज कोविड लसीचे ५ लाख डोस पुरवण्याची विनंती केली. आरोग्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या एक दिवसानंतर, बोम्माई यांनी शुक्रवारी सांगितले की मांडविया यांनी सप्टेंबरपासून दररोज ५ लाख लस डोस देण्याचे आश्वासन दिले आहे.
गुरुवारी झालेल्या बैठकीत, बोम्माई यांनी साथीच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांविषयी केंद्रीय मंत्र्याना माहिती दिली. “राज्याने पुढील महिन्यापासून दिवसाला ५ लाख लसीकरण करण्याची योजना आखली आहे. आरोग्यमंत्र्यांनी मागणी पूर्ण करण्यासाठी आश्वासन दिले आहे,” असे बोम्माई यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
यापूर्वी केंद्राने राज्य सरकारला दररोज लसीचे ३.५ लाख डोस दिले होते. गेल्या आठवड्यात, ते वाढवून ४-४.५ लाख डोस दिले गेले. “काल, आम्ही दररोज ५ लाख डोस देण्याचीच मागणी केली. भविष्यात, आम्ही दिवसाला ५ लाख डोसची देण्याची योजना आखली आहे,” असे बोम्माई म्हणाले.