वृत्तसंस्था/ बेंगळूर
2022-23 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्यातील शेवटच्या दिवशी सौराष्ट्रने कर्नाटकाचा 4 गड्यांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. कर्नाटकाने सौराष्ट्रला निर्णायक विजयासाठी 115 धावांचे आव्हान दिले होते आणि सौराष्ट्रने 6 बाद 117 धावा जमवत शानदार विजय नोंदवला. या सामन्यात सौराष्ट्रचा कर्णधार आणि द्विशतकवीर अर्पित वासवदाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात कर्नाटकाने पहिल्या डावात 407 धावा जमवल्यानंतर सौराष्ट्रने पहिल्या डावात 527 धावांचा डोंगर 120 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. त्यानंतर कर्नाटकाचा दुसरा डाव 58.2 षटकात 234 धावात आटोपला. कर्नाटकाच्या दुसऱ्या डावात निकीन जोशचे शतक तसेच कर्णधार मयांक अगरवालचे अर्धशतक वाया गेले. सौराष्ट्रच्या चेतन साकारिया आणि धर्मेंद्र सिंग जडेजा यांच्या अचूक गोलंदाजीसमोर कर्नाटकाचे फलंदाज लवकर बाद झाले. जोशने 9 चौकारासह 109 तर अगरवालने 5 चौकारासह 55, के. गौतमने 2 षटकार आणि 1 चौकारासह 23, विजयकुमार विशाखने 1 चौकारासह 20 धावा जमवल्या. साकारियाने तसेच जडेजाने प्रत्येकी 4 तर पार्थ भूतने 2 गडी बाद केले.
सौराष्ट्रला निर्णायक विजयासाठी 115 धावांचे आव्हान कर्नाटकाकडून मिळाले. कर्नाटकाच्या के. गौतम आणि व्ही. कौशिक यांची गोलंदाजी प्रभावी झाली पण कर्णधार वासवदाने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 51 चेंडूत 7 चौकारासह नाबाद 47 तर चेतन साकारियाने 48 चेंडूत 3 षटकारासह 24 धावा जमवल्याने सौराष्ट्रला हा सामना जिंकता आला. 34.2 षटकात सौराष्ट्रने 6 बाद 117 धावा जमवल्या. कर्नाटकाच्या के. गौतमने 38 धावात 3 तर कौशिकने 32 धावात 3 गडी बाद केले. साकारिया आणि वासवदा यांनी सहाव्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केल्याने कर्नाटकाला पराभवाला सामोरे जावे लागले. आता सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात अंतिम सामना 16 फेब्रुवारीपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. 2019-20 च्या रणजी हंगामात सौराष्ट्रने अजिंक्यपद मिळवले होते. तर आता सौराष्ट्र आणि बंगाल याच्यातील 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार अंतिम सामना चुरसीचा राहिल. कारण उभय संघात 2019-20 च्या रणजी हंगामात अंतिम फेरीत गाठ पडली होती. सौराष्ट्रने आतापर्यंत या स्पर्धेत पाचवेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
संक्षिप्त धावफकल : कर्नाटक प. डाव 133.3 षटकात सर्व 407, सौराष्ट्र प. डाव 174.4 षटकात सर्व बाद 527, कर्नाटक दु. डाव 58.2 षटकात सर्व बाद 234 (निकीन जोश 109, मयांक अगरवाल 55, के. गौतम 23, विशाख 20, चेतन साकारिया 4-45, धर्मंद्र सिंग जडेजा 4-79, भूत 2-57), सौराष्ट्र दु. डाव 34.2 षटकात 6 बाद 117 (वासवदा नाबाद 47, चेतन साकारिया 24, विश्वराज जडेजा 17, हार्विक देसाई 11, के. गौतम 3-83, कौशिक 3-32).