वृत्तसंस्था/ मुंबई
अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कर्नाटकाने यजमान मुंबईचा रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ब गटातील सामन्यात रविवारी 5 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. कर्नाटकाने हा सामना अडीच दिवसामध्ये जिंकला. या स्पर्धेतील कर्नाटकाचा हा सलग चौथा निर्णायक विजयी सामना आहे तर मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. मुंबईला यापूर्वी रेल्वे संघाकडून हार पत्करावी लागली होती.
2013-14 च्या रणजी मोसमानंतर कर्नाटकाचा मुंबईवर हा पहिला निर्णायक विजय आहे. या सामन्यात कर्नाटकाला निर्णायक विजयासाठी 126 धावांची जरूरी होती. कर्नाटकाने 5 बाद 129 धावा जमवित हा सामना जिंकला. कर्नाटकाच्या दुसऱया डावात सलामीच्या समर्थने दोन चौकारांसह 34, देवदत्त पडीकलने 2 षटकार आणि 5 चौकारांसह 50 धावा झळकविल्या. उपाहारावेळी कर्नाटकाने बिनबाद 77 धावा केल्या होत्या. खेळाच्या दुसऱया सत्रात मुंबईच्या अतार्देने पडीकलला तसेच अभिषेक रेड्डीला 4 धावांवर बाद केले. त्यानंतर मुलानीने समर्थला बाद केले. अतार्देंने रोहन कदमला 21 धावांवर बाद केले. कर्णधार नायरने 10 धावा जमविल्या. अतार्देने नायरला तंबूचा रस्ता दाखविला. शेवटी श्रेयस गोपाल नाबाद 5 आणि शरथ नाबाद 4 यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. या सामन्यात कर्नाटकाला 6 गुण मिळाले.
बडोदा येथे झालेल्या या स्पर्धेतील सामन्यात बडोदा संघाने रेल्वेचा 99 धावांनी पराभव केला. या सामन्यात बडोदा संघाने पहिल्या डावात 201 धावा जमविल्यानंतर रेल्वेचा पहिला डाव 99 धावांत अटोपला. त्यानंतर बडोदा संघाने दुसऱया डावात 98 धावा केल्या. रेल्वेचा दुसरा डाव 101 धावांत गुंडाळून बडोदा संघाने हा सामना जिंकला. बडोदा संघाला या सामन्यात 6 गुण मिळाले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई प. डाव सर्वबाद 194, कर्नाटक प.डाव- सर्वबाद 218, मुंबई दु. डाव- 9 बाद 149, कर्नाटक दु. डाव 5 बाद 129.
बडोदा प. डाव- 201, रेल्वे प.डाव 99, बडोदा दु. डाव 98, रेल्वे दु. डाव 101.