बेंगळूर/प्रतिनिधी
महाराष्ट्रात गुरुवारी महत्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिला, त्याचवेळी योगायोगाने कर्नाटकातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कर्नाटक विधान परिषदेचे सभापती के. प्रतापचंद्र शेट्टी यांनीही गुरुवारी पदाचा राजीनामा दिला. सदनाच्या पटलावरुनच शेट्टींनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यामुळे भाजप-जनता दल (सेक्युलर) युतीचा विधानपरिषदेवर ताबा मिळवण्याचा मार्ग सोपा झाला आहे. त्यामुळे सभापती पदावर जेडीएस पक्षाच्या सदस्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
जेडीएस भाजप सोबत
के. प्रतापचंद्र शेट्टी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला होता. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बुधवारी के. प्रतापचंद्र शेट्टी यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली होती. भाजपने आणलेल्या प्रस्तावाला जेडीएसचे समर्थन मिळाले. अविश्वास प्रस्तावाला सामोरं न जाताच शेट्टींनी राजीनामा दिला. भाजप-जनता दल (सेक्युलर) युतीकडे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
विधानपरिषदेच्या सभापतीपदी बसवराज होरट्टी ?
भाजपच्या मदतीने जेडीएसचे ज्येष्ठ आमदार बसवराज होरट्टी विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवडले जाण्याची शक्यता आहे. 75 सदस्यीय कर्नाटक विधान परिषदेत दोन्ही पक्षांचे मिळून एकूण 43 आमदार आहेत. भाजपचे गटनेते श्रीनिवास पुजारी यांनी विधानपरिषदेच्या सत्राचा विस्तार करण्याची मागणी केली. 8 किंवा 9 फेब्रुवारीला नव्या सभापतींची निवड व्हावी, यासाठी भाजपतर्फे ही मागणी करण्यात आली आहे.
सभापतीपदावरुन पायउतार होताना के. प्रतापचंद्र शेट्टी यांनी सर्व विधानपरिषद सदस्यांचे आभार मानले. ’15 डिसेंबरला सदनात झालेल्या गोंधळासारख्या घटना रोखण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. लोकशाही व्यवस्थेत सर्व निर्णय संख्यात्मक बळाच्या आधारावर घ्यावे लागतात. पण सभापतीच्या रुपाने घेतलेले निर्णय शेतकरी, महिला आणि सर्व समाजाच्या हिताचे असावेत’ अशी अपेक्षा शेट्टींनी व्यक्त केली.