मंत्री सी. टी. रवी यांचे संकेत : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदा तयार करणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेशनंतर आता कर्नाटकातही लव्ह जिहादविरोधी कायदा जारी करण्याचा विचार सुरू आहे. हिंदु युवतींना आमिष दाखवून विवाह करून त्यांचे बळजबरीने धर्मांतर करण्यात येत असल्याची प्रकरणे वाढल्यामुळे कर्नाटकातही लव्ह जिहादाविरोधी कायदा जारी करणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव आणि मंत्री सी. टी. रवी यांनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा जारी करणार असल्याचे घोषणा केली होती. यापाठोपाठ मंत्री सी. टी. रवी यांनी देखील कर्नाटकात लवकरच बळजबरीने लग्नासाठी केल्या जाणाऱया धर्मांतरावर बंदी आणणारा कायदा जारी करण्यात येईल, असे सांगितले आहे.
यासंबधी ट्विट करताना मंत्री सी. टी. रवी यांनी, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्नाटकातही लग्नाच्या उद्देशाने धर्मांतर करण्यावर बंदी आणण्यात येईल. लव्ह जिहादप्रकरणांना चाप लावण्यासाठी कठोर कायदा आणणे आवश्यक आहे. शिवाय अशा गुन्हय़ांमध्ये सहभागी होणाऱयांना त्वरित शिक्षा करणे गरजेचे आहे, असे सांगितले आहे.
प्रेमाच्या नावाखाली जिहादसारख्या घटना घडू नयेत. अशा पद्धतीला वेळीच आळा घालण्यासाठी कायदा तयार करण्यात येईल. आपली खरी ओळख लपवून हिंदु युवतींच्या सन्मानाला धक्का पोहोचविणाऱयांना कठोर शिक्षा करण्यात येणार आहे. लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी नवा कायदा आवश्यक आहे का?, याबाबत विचार करून नवा कायदा तयार करण्याची सूचना राज्य गृहखात्याने कायदा खात्याच्या अधिकाऱयांना दिल्याचे समजते.
उत्तर प्रदेश सरकारने जारी करण्यासाठी तयार केलेल्या धर्मांतर विरोधी मसुद्यात अनेक त्रूटी आहेत. अशा परिस्थितीतही काही राज्यांनी हा कायदा जारी करण्याचा विचार चालविला आहे.