काणकोणातील जागरूक नागरिकांची मागणी, उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर
प्रतिनिधी / काणकोण
कोरोना महामारीच्या अनुषंगाने सुरुवातीचा जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात काणकोण पोलीस, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, वीज खाते आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱयांनी जी सेवा दिली त्याचे कौतुक करतानाच यापुढील दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. बेळगावसारख्या ठिकाणी 17 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत पोळे चेकनाक्यावरून कर्नाटक राज्यातील कोणत्याच वाहनाला प्रवेश देऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन काणकोणच्या जागरूक नागरिकांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले आहे.
फळे आणि भाज्या घेऊन काही वाहने पोळे चेकनाक्यावरून गोव्यात प्रवेश करतात असे निदर्शनास आले आहे. विशेषता कामगार वर्गावर बंदी घालावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर जनार्दन भंडारी, महादेव देसाई, संदेश तेलेकर, प्रलय भगत, धीरज ना. गावकर सर्वानंद कोमरपंत, रजत च्यारी, वैभव भट यांच्या सहय़ा आहेत.
एका बाजूने परराज्यांतील वाहनांना राज्यात प्रवेशबंदी केल्याचे सरकार जाहीर करत असतानाच पोळे चेकनाक्यावरून मात्र फळ-भाज्यांची वाहने सरळ सोडण्यात येत असून कलिंगडे, अननस आणि केळी घेऊन येणाऱया वाहनांना देखील चेकनाका मोकळा असल्याच्या तक्रारी आता वाढायला लागल्या आहेत. बेळगावात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळले आहेत. काणकोणसारख्या भागात तरी बेळगाव आणि हुबळी येथूनच भाज्यांचा पुरवठा केला जातो. कर्नाटकातून परवाना घेऊन येणाऱया वाहनांना कसलीच आडकाठी न करता केवळ तात्पुरती वैद्यकीय चाचणी करून मोकळीक देण्याचे प्रकार या ठिकाणी वाढलेले असून या चेकनाक्यावर काम करणाऱया कर्मचाऱयांची मात्र गोची होत असल्याच्या तक्रारी आता वाढायला लागल्या आहेत.
कारवाहून येणाऱया कर्मचाऱयांना मोकळीक
वेर्णा येथील सिप्ला औषध कंपनीत काम करणारे जवळजवळ 40 कर्मचारी कारवार भागातून येत असतात. या कर्मचाऱयांना पोळे चेकनाक्यावरून सोडण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही मालवाहू वाहने आणि फळ-भाज्यांच्या वाहनांना या नाक्यावरून सोडण्यात येत असल्याची माहिती संबंधितांनी दिली.
उपसभापतींकडून पाहणी
दोन दिवसांपूर्वी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी पोळे चेकनाक्याला भेट देऊन त्या ठिकाणी चालू असलेल्या कामाचा आढावा घेतला होता. यावेळी संदेश तेलेकर, सम्राट भगत, अजय लोलयेकर आणि अन्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. चेकनाक्यावर कडक तपासणी करूनच वाहने सोडण्यात यावीत, अशी सूचना फर्नांडिस यांनी दिली.
दुचाकीस्वारांची कडक तपासणी चालूच
दुसऱया बाजूने चावडीवरील जुन्या बसस्थानकावर पोलिसांचे तपासणी सत्र चालूच आहे. काही गरज नसताना फिरणाऱया दुचाकीस्वारांची कडक तपासणी या ठिकाणी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मागच्या दोन दिवसांत गर्दीवर काहीसा परिणाम झालेला असला, तरी 20 पासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली आहे. काही प्रमाणात वाहतूकही सुरू होणार आहे. त्यानंतर मात्र रस्त्यावरील गर्दी नियंत्रणात आणायला पोलिसांना त्रास होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.