पोलिसांकडून दखल : आडवाटांवर 30 पोलीस तैनात : पोळे चेकनाक्याला भेट देऊन पाहणी : अधीक्षक अरविंद गावस यांची माहिती
प्रतिनिधी / काणकोण
पोळे चेकनाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला असताना कर्नाटक आणि गोव्याला जोडणाऱया आडवाटांनी दरदिवशी मोठय़ा प्रमाणात कर्नाटकातून लोक गोव्यात प्रवेश करत असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने काल सोमवारी प्रसिद्ध केल्यानंतर एकच खळबळ उडाली. दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस, काणकोणचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी त्वरित पोळे चेकनाक्याला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
या चेकनाक्यावरून जितकी वाहने गोव्यात प्रवेश करतात आणि जे लोक येतात त्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर सर्व आडवाटांवर मिळून जादा 30 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत, अशी माहिती अधीक्षक गावस यांनी दिली. असे असताना आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यास त्वरित काणकोण पोलीस स्थानकावर त्याची माहिती द्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.
पोर्तुगीज काळापासून वाटांचा वापर
तिळमातीहून माजाळीमार्गे पोळे, मुडगेरीहून कर्लेमार्गे तिर्वण आणि मुडगेरीहून मार्ली, गोपशिट्टाहून बेलामार्गे गोवा या रानातील वाटांचा वापर माजाळी आणि गोव्यातील सीमावर्ती भागांतील लोक पोर्तुगीज काळापासून करत आलेले आहेत. गोवा मुक्तीसंग्रामाच्या काळात याच वाटांचा वापर सत्याग्रही आणि भूमिगत कार्यकर्ते करत होते. त्यामुळे या वाटा समजणारे लोक दोन्ही ठिकाणी आहेत.
आडवाटेने येण्याचे प्रकार दोनदा उघडकीस
चेकनाक्यावर जरी कडक पोलीस बंदोबस्त असला, तरी या आडवाटा मोकळय़ा असल्यामुळे याच वाटांचा वापर करून परराज्यातील लोक गोव्यात प्रवेश करू लागले होते. याला काही जाणत्या लोकांनीही दुजोरा दिला. मागच्या आठवडय़ात अशा प्रकारच्या एका आडवाटेने आलेल्या लोकांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याची घटना घडली होती. मार्ली येथील महिलांनी मुडगेरी येथून आलेल्या 20 पेक्षा अधिक लोकांना हाकलून लावण्याचा प्रकार घडला होता.
उपसभापती फर्नांडिसकडून गंभीर दखल
दरम्यान, काणकोणचे आमदार असलेले उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी देखील तरुण भारतच्या वृत्ताची गंभीर दखल घेतली आहे. आपण स्वतः कोकण रेल्वे मार्ग, पोळे नदीचा काठ आणि चेकनाक्यावर लक्ष ठेवून आहे. यापुढे तिळमाती, मार्ली तसेच कर्ले या ठिकाणी देखील आपण स्वतः भेट देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काणकोणात 180 पोलीस कर्मचारी
काणकोण तालुक्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या एकूण 180 पोलीस कर्मचारी काम करत आहेत. त्यात राजेंद्र प्रभुदेसाई, रमेश शिरोडकर, तुकाराम चव्हाण हे तीन पोलीस निरीक्षक, 9 उपनिरीक्षक, 3 साहाय्यक उपनिरीक्षक, 10 हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल, महिला पोलीस आणि अन्य मिळून 100 पोलिसांचा समावेश आहे. त्याशिवाय वेगळा वाहतूक पोलीस विभाग आहे. महिला व पुरुष मिळून 45 गृहरक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. पोळे चेकनाका, चावडी, देवाबाग या ठिकाणी 24 तास नाकाबंदी असते. पोळे चेकनाक्यावर 40 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. हे सर्वजण तीन पाळय़ांमधून काम करत आहेत.
अंतर्गत रस्त्यांवर तालांव देण्याप्sाक्षा आडवाटांवर नाकाबंदी करा ः भंडारी
राष्ट्रीय हमरस्त्यावरून परराज्यातील व्यक्ती विनासंमती प्रवेश करू शकत नसल्याचे दिसत आहे. पण त्याचबरोबर काही ठिकाणी पोलीस कर्मचारी रस्ते अडवून औषधालये, आरोग्य केंद्रात आणि जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी जे लोक जातात त्याना तालांव देतात. ते करण्यापेक्षा या पोलिसांना जंगलातील आडवाटांवर नाकाबंदी करण्यासाठी पाठवावे. त्याचबरोबर याकामी शक्यतो स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी केली आहे. आपण यासंदर्भात उपजिल्हाधिकारी प्रीतिदास गावकर यांना निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात चौकशी करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गावकर यांनी दिलेली आहे, असे भंडारी यांनी स्पष्ट केले.
गर्ग यांच्याकडून पोळे चेकनाक्यावरील बंदोबस्ताचा आढावा
पोळे चेकनाक्यावर कसा काय बंदोबस्त ठेवण्यात आला आहे याची माहिती मिळविण्यासाठी राज्य सरकारचे निरीक्षक असलेले आयएएस अधिकारी सी. आर. गर्ग यांनी काल सोमवारी 27 रोजी काणकोण तालुक्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले दीपक देसाई, काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रीतिदास गावकर, मामलेदार विमोद दलाल यांच्यासहित भेट दिली आणि तेथील कामकाजाची माहिती मिळविली. या चेकनाक्यावर कडक बंदोबस्त असला, तरी परप्रांतांतील नागरिक आडवाटांनी गोव्यात प्रवेश करतात अशी माहिती मिळाल्यामुळेच त्यांनी या चेकनाक्याला भेट दिली आणि काही महत्त्वाच्या सूचना केल्या, अशी माहिती दीपक देसाई यांनी दिली.