सातारा पोलीस संरक्षणात दररोज 15 टन बेलाळीतून ऑक्सिजन पुरवठा
सातारा / विशाल कदम
कोरोनामुळे साताऱयाची बिकट परिस्थिती झालेली आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते आहे. ऑक्सिजनविना अनेकांचे प्राण तडफडून जात आहेत. मात्र, याच सातारकरांचे जीव वाचवण्यासाठी सातारा आगारातील एसटीचे चालक स्वतः सारथ्य करत आहेत. तब्बल 1200 किलोमीटर ऑक्सिजनची गाडी चालवून सेवा देत आहेत. साताऱ्यात बेलाळीहून ऑक्सिजन सातारा पोलीस बंदोबस्तात पोहचवण्याचे काम सातारा आगाराचे चालक करत आहेत. गतवर्षी सातारा आगाराच्या चालकांनी पश्चिम बंगाल येथे कामगारांना पोहचवले होते. यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सातारा आगारातील चालक चक्क कर्नाटकातुन साताऱयात ऑक्सिजन पुरवठा करत आहेत.
कोरोनाचा अक्षरशः विस्फोट सुरु आहे. सातारा जिह्यात अनेकांना ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. अनेकांचे जीव त्यामुळे तडफडून जात आहेत. साताऱ्यात ऑक्सिजनची गरज असल्याने जिल्हा प्रशासनानेच विशेषतः जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजनची मागणी केली आहे. त्यानुसार तो ऑक्सिजन आणण्यासाठी साताऱयातील एमआयडीसीमधील केवाय नायट्रो या कंपनीच्या टँकरला अधिकृत परवानगी दिली गेली आहे. त्यांना सातारा आगारातील चालक टँकर चालवण्यासाठी दिले गेलेले आहेत. दि.25 रोजी पहिला टँकर घेवून सातारा आगाराचे चालक राहुल कदम, कंपनीचे चालक जरग, सातारा पोलीस ठाण्यातील दोन एएसआय असे चौघेजण कर्नाटकच्या दिशेने रवाना झाले.
मजल दरमजल करत त्यांनी टँकर कोल्हापूर जिह्यातून महाराष्ट्राची सिमा पार करत सायंकाळी हुबळी, गदग करत बेलाळीला पोहचले. तब्बल सहाशे किलोमीटरचे अंतर पार करुन ते पोहचताच बेलाळीतील जिंदाल कंपनीत टँकरमध्ये 15 टन ऑक्सिजन भरुन घेतला अन् पुन्हा साताऱयाच्या दिशेने निघाले. दोन पोलीस सोबत असल्याने कुठेही अडचण आली नाही. परंतु कर्नाटकामध्येही लॉकडाऊन असल्याने जेवण आणि पाण्याचे मात्र हाल झाले. चौघांनी मिळून साताऱयासाठी कर्नाटकातून 15 टन ऑक्सिजन आणला. तो ऑक्सिजन जंबो हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात खाली केला. मंगळवारी ही गाडी खाली केली. तेव्हापासून सातारा आगारातील एक चालक, दोन पोलीस आणि कंपनीतील एक चालक असे चौघेजण ऑक्सिजनचा टँकर कर्नाटकातून घेवून येत आहेत. गतवर्षी सातारा आगारातील चालकांनी चक्क कामगारांना पश्चिम बंगाल येथे पोहचवले होते. वादळाच्या तडाख्यात सापडले होते. एक दिवस वादळात राहून ते परत साताऱयाकडे फिरले होते.याही वर्षी सातारा आगाराचे चालक जीगरबाज असून त्यांचे काम सातारकरांसाठी अनमोल असे ठरत आहे. दरम्यान, आणखी दोन चालक टँकर घेवून गेलेले आहेत.