कर्नाटक सरकारकडून संबंधित दूतावासांशी साधणार संपर्क
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावसह संपूर्ण राज्यात परदेशातून धर्म प्रचारासाठी आलेल्या 57 तबलिगींवर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. पर्यटन व्हिसावर भारतात येऊन धर्मप्रचारात गुंतलेल्या या तबलिगींची नावे काळय़ा यादीत समाविष्ट करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांनी जोर धरला आहे. यामध्ये बेळगावमध्ये सापडलेल्या 10 जणांचा समावेश आहे.
गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बेंगळूर येथे यासंबंधीची माहिती दिली होती. राज्यात एकूण 57 परदेशी तबलिगींवर एफआयआर दाखल करून त्यांचे पासपोर्ट व व्हिसा ताब्यात घेण्यात आले आहेत. याबरोबरच त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. नियमांचा उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
बेळगाव येथील रामतीर्थनगर परिसरात तळ ठोकलेल्या इंडोनेशियातील दहा तबलिगींवर माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेंगळूर शहरात 31, बिदर जिल्हय़ात 8 व तुमकूर जिल्हय़ात 8 असे एकूण वेगवेगळय़ा देशातून कर्नाटकात आलेल्या तबलिगींवर प्रशासनाने एफआयआर दाखल केला आहे.
हे सर्वजण नवी दिल्ली येथील तबलिगी जमातच्या धर्मसभेत भाग घेऊन कर्नाटकात आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार 9 देशांच्या दूतावासांशी संपर्क साधून या 57 जणांची नावे काळय़ा यादीत समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यापुढे त्यांना व्हिसा मिळू नये यासाठी हे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
इंडोनेशियातून 20 जण, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, केनियामधून प्रत्येकी एक, बांगलादेशमधून 7, किर्गीस्तानमधून 19, झांबियातून 3, दक्षिण आफ्रिकेतून 4 जण असे एकूण 57 जण परदेशातून कर्नाटकातून आले आहेत. बेळगाव, बिदर, तुमकूर व बेंगळूर शहरात सध्या त्यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवण्यात आली आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. लॉकडाऊन उठविल्यानंतर या विदेशींचे प्रकरण मार्गी लागणार आहे.