बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यासह राजधानी बेंगळूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात बुधवारी कोरोनाने उचांक गाठला. बुधवारी राज्यात कोरोनाने ११ हजारांच्या पुढे मजल मारली. बुधवारी राज्यात कोरोना रुग्णांची नवीन प्रकरणांची संख्या ११,२६५ वर गेली. गेल्या चोवीस तासात राज्यात ३८ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी २३ जणांचा बेंगळूरमध्ये मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार बुधवारी ४,३६४ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परत आले आहेत.
राज्यात सध्या सक्रिय रूग्णांची संख्या ८५,४८० वर पोहोचली आहे. बुधवारपर्यंत कोविडमुळे राज्यात एकूण १३,०४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. बुधवारी जिल्ह्यात ८,१५५ बाधितांची भर पडली आहे. तर २५४० रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परत आले आहेत. तर २३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,९३३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.