मंगळवारी 13 जण पॉझिटिव्ह : राज्यात रुग्ण संख्या 101 बेंगळूरमध्ये सर्वाधिक 45 जण कोरोनाबाधित
प्रतिनिधी/बेंगळूर
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत असून मंगळवारी राज्यात 13 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 101 झाली आहे. बेंगळूरमध्ये 4 बळ्ळारीत 3, म्हैसूरमध्ये 2 तसेच गुलबर्गा, चिक्कबळ्ळापूर, मंगळूर, कारवार जिल्हय़ात प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.
बळ्ळारी जिल्हय़ात एकाच कुटुंबातील तिघेजण कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्हा प्रशासनाने खबरदारी बाळगून देखील होस्पेट शहरात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार केले जात आहेत. 16 मार्च रोजी बेंगळूरमधील नातेवाईकांच्या घरी जाऊन 19 मार्च रोजी होस्पेटला परतले होते. त्यापैकी 52 वर्षीय पुरुष त्याची 48 वर्षीय पत्नी आणि 26 वर्षीय मुलीच्या स्वॅबचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर बेंगळूरमध्ये 40 वर्षीय व्यक्ती आणि अमेरिकेहून परतलेल्या 19 वर्षीय युवकाला कोरोना झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.
बेंगळूरमध्ये मंगळवारी एकाच दिवशी 4 जणांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये 40 वर्षीय पुरुष आणि 62 महिलेचा समावेश आहे. तसेच गुलबर्गा येथे कोरोनाचा देशात पहिला बळी ठरलेल्या वृद्धाच्या 60 वर्षीय पत्नीला देखील कोरोनाची बाधा झाली आहे.
चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ाच्या गौरीबिदनूरमध्ये 40 वर्षीय महिला तर म्हैसूर जिल्हय़ाच्या नंजनगूड येथे कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने 35 वर्षीय आणि 41 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. त्यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल मंगळवारी सकाळी उपलब्ध झाला. त्यामुळे म्हैसूर जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या 14 झाली आहे. त्याचप्रमाणे दुबईहून आलेल्या 35 वर्षीय व्यक्तीला मंगळूरमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. तर कारवार जिल्हय़ाच्या भटकळ येथे दुबईहून परतलेल्या 26 वर्षीय युवकातही कोरोनाचे विषाणू आढळले आहेत.